Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ट्वेंटी-२० स्पर्धेचे नियम

ट्वेंटी-२० स्पर्धेचे नियम
ND
क्रिकेटचे नियम काही अपवाद वगळता ट्वेंटी-२० लाही तसेच लागू आहेत.

प्रत्येक गोलंदाज प्रत्येक डावात असलेल्या एकूण षटकांच्या एक पंचमांश षटके टाकू शकेल. (सर्वसाधारणपणे, कोणताही अडथळा न आलेल्या सामन्यात प्रत्येक गोलंदाजाच्या वाट्याला चार षटके येतील.)

कोणताही संघ वेळ वाया घालवत असल्याचे लक्षात आल्यास पंच त्या संघाला पाच धावांचा दंड करू शकतील.

क्षेत्ररक्षण करणारा संघ ७५ मिनिटांच्या आत विसावे षटक टाकत नसल्यास पंच ७५ मिनिटानंतर टाकल्या जाणार्‍या प्रत्येक षटकासाठी फलंदाजी करणार्‍या संघाला सहा धावा बहाल करू शकतात. क्षेत्ररक्षण करणारा संघ जास्तच वेळ वाया घालवत असल्याचे लक्षात आल्यास पंच त्याहून अधिक धावाही प्रतिस्पर्धी संघास बहाल करू शकतात.

क्षेत्ररक्षणावर खालील निर्बंध असतील.
लेग साईडला कोणत्याही वेळी पाचपेक्षा जास्त क्षेत्ररक्षक असणार नाहीत.
पहिल्या सहा षटकांदरम्यान तीस यार्डाच्या वर्तुळाबाहेर जास्तीत जास्त दोनच क्षेत्ररक्षक असतील.
पहिल्या सहा षटकांनंतर तीस यार्डाच्या वर्तुळाबाहेर जास्तीत जास्त पाच क्षेत्ररक्षक असतील.
दोन्ही संघांच्या धावांची बरोबरी होऊन सामना निर्णायक न झाल्यास विजेता ठरविण्यासाठी बॉल आऊट ( फुटबॉलमधील पेनल्टी शूट-आऊटप्रमाणेच) हा पर्याय आजमावला जाईल. बॉल-आऊटमध्ये दोन्ही संघांचे प्रत्येकी पाच गोलंदाज यष्टीच्या दिशेने प्रत्येकी एक चेंडू टाकतील. ज्या संघाच्या गोलंदाजांनी जास्तीत जास्त वेळा यष्टी उडवली तो विजेता ठरेल. मात्र, याही पर्यायावेळी बरोबरी झाल्यास गोलंदाजी सुरूच राहील आणि निर्णय 'सडनडेथ' वर ठरविला जाईल.

एखाद्या गोलंदाजाने क्रिझच्या पुढे जाऊन बॉल टाकल्यास तो 'नो बॉल' ठरविला जाईल. त्यासाठी प्रतिस्पर्धी संघाला एक धाव तर मिळेलच, पण त्या गोलंदाजाचा पुढचा चेंडू 'फ्री हिट' समजला जाईल. या चेंडूवर फलंदाजाला बाद करण्यासाठी धावचीत हाच एकमेव पर्याय असेल. याशिवाय क्रिकेटच्या 'नो बॉल'साठीच्या मूळ नियमानुसार चेंडूला दुसर्‍यांदा तटविणे, तो अडविणे किंवा हाताळणे या प्रकारांनीही फलंदाज बाद होऊ शकतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi