Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

"झुकल्या पापण्या"

, शुक्रवार, 10 जून 2016 (14:17 IST)
नव्या घराचा पाया भरतांना
तो दिसला मला माझ्याकडे येतांना...
येताच म्हणाला,
मी वास्तुशास्त्र जाणतो..
कुठे बेड, कुठे हॉल….
कुठे किचन असावं सांगतो..
शास्त्र माझे सर्व काही सांगते
मी सांगेन तिथेच सुख नांदते…
ऐकून त्याचा सारा कित्ता
मी म्हणालो,
दोस्ता थोडं थांब अन्...
मला तिथल्या सुखाचं गुपीत सांग...
जिथं…..
दहा बाय दहाच्या खोलीत
मोठा समूह रहातो...
जिथं...
या कुशीवर वळलं की बेड होतो...
त्या कुशीवर वळलं की हॉल…
पोटात आग पडली की तेच किचन...
कुठल्याच सुखसोई नसल्या तरीही
मजेत फुलतो  देह…..
ना कुणा रक्तदाब ना कुणा मधुमेह…..
काही सूचत नसेल तर तसं सांग...
न बोलताच का चाललास लांब..
दोस्ता...
कदाचित इलाजाला पैसा नसेल..
‘विरंगुळ्याचे रोग’ लागत नसतील...
त्यांचं दुःखच देतं त्यांना जगण्याचं बळ...
त्याचं दुःखच घालतं त्यांना जगण्याची गळ...
नीट उत्तर दे...
प्रश्न आणखी विचारतो सोपा..
कुठल्या शास्त्राला विचारून सुगरण विणते खोपा…?
दोस्ता… 
सुख नांदण्यासाठी
या खोलीचं तोंड त्या दिशेला नसावं...
त्या खोलीचं तोंड या दिशेला नसावं...
या तकलादू शास्त्रापेक्षा….
माणसाचं तोंड माणसाकडं असावं...
माणसाचं मन माणसाला दिसावं…

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रथमेश शोधतोय हरवलेल्या गौरीला