Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अभी अभी तो आयी हो बहार बन के छायी हो...

अभी अभी तो आयी हो बहार बन के छायी हो...
अभी अभी तो आयी हो
बहार बन के छायी हो...
 
असं म्हणता म्हणता
निरोप घ्यायची
निरोप द्यायची वेळ आली !
 
आले, आले म्हणत
ती आली
आणि आज परत निघाली सुध्दा !
 
तो तिचा मनभरला गंध,
तिचा पहाटेचा दरवळ,
सगळंच सुगंधमय !
 
तिचा संध्याकाळचा दीपमय शृंगार,
तिचं ते तेजानं लखलखणारं रुप,
सगळंच ज्योतिर्मय !
 
अंगणातल्या किल्ल्यावरची पणती
आणि
तुळशी वृंदावनातली पणती
आज संध्याकाळ पासून तेवत होत्या
पण गुमसुम झाल्या होत्या...
एकमेकींकडे बघत,
हळूवार मान हलवत होत्या,
निरोपाच्या वेळी दोन सख्यांची 
मान हलते ना तशी !
 
भाऊबीजेची संध्याकाळ जेवढी
प्रसन्न करणारी,
तेवढीच ती संध्याकाळ
मनाचा एक कोपरा विषण्ण करणारी !
कारण ती आता परतीच्या प्रवासाला
निघणार असते !
 
जीवघेणी,
कासावीस करणारी ही सांजवेळ
आणि रात्रही !
 
आई वडिल,
आज्जी आजोबा,
चार आठ दिवस आपलं सगळं
वृध्दत्त्व, दुखणीखुपणी
औषधपाणी, गुडघेदुखी, अंगदुखी
सगळं सगळं विसरुन,
बहिणभावांसोबत,
पोराबाळांसोबत,
लेकी सुनांसोबत,
नातवंडांसोबत,
नातेवाईकांसोबत,
मित्रांसोबत,
परत एकदा
विसरलेलं, हरवलेलं 
आपलं जगणं जगलेली असतात !
 
आणि...
 
आता घराकडं चार आठ दिवस आलेली पाखरं परतण्याच्या तयारीत,
सामानाची चाललेली बांधाबांध,
उद्या निघायची तयारी !
 
आई - आज्जीची भरुन येणारे डोळे लपवत डबे भरुन देण्याची चाललेली गडबड...
बाबांची - आजोबांची थरथरत येणारी हांक...
चष्म्याआडून भरलेले डोळे लपवत 
त्यांचं सुरु असलेलं 
पण मन लागत नसलेलं
कसलंतरी वाचन ! 
 
मधेच कधी तरी, "अजून एक दोन दिवस नाही का रे थांबता येणार तुम्हाला ?"
 
काय सांगायचं उत्तर या प्रश्नाचं ?
 
परत केव्हा येणार ?
परत केव्हा भेटणार ?
हेच प्रश्न त्यांच्या डोळ्यातून फुटणारे !
 
वर्षभर इतर वेळी घरी येतो आणि जातोही पण तेव्हा असं नाही जाणवत मग दिवाळी करुन परत जातानाच हे असं का ?
 
दिवाळी आली,
आणि
दिवाळी निघाली !
 
सगळे गंध,
सगळं तेज,
सगळी आपुलकी, 
मनामनात भरुन निघाली !
 
कासावीस व्हायला होतं...
 
जीवघेणी वेळ आली आहे असं वाटतं ! एखाद्या अतिसुंदर, अवर्णनीय मैफिलीची भैरवी होताना असंच होतं ना ! ती मैफिल पूर्ण होताना एखाद्या अपूर्णतेची अनामिक हुरहूर मनात ठेवतेच ना ! ती अपूर्णता कोणती ते मात्र कळत नाही... व्याकुळता वाढवते ती अपूर्णता !
 
तसंच दिवाळीचं...
आज तीच हुरहूर...
तीच व्याकुळता...
तीच कातरता...
तोच हळवेपणा...
 
भरुन उरलंय मनात !
 
तरीपण तिला देखणा आणि 
तिच्यासारखांच तेजाळ निरोप  द्यायलाच हवा, तिच्यासाठी कृतज्ञता तर व्यक्त व्हायलाच हवी !
 
सगळ्यांची मनं ज्योतिर्मय करुन निघाली आहेस बै...
दिलंस ते भरभरून दिलंस तू...
जगण्याची ओढ जिवंत ठेवली आहेस तू... 
जगण्याची लढाई जिंकायला तेजोबल दिलं आहेस तू... 
एकमेकांना भेटवलं आहेस तू...
मनामनातला अंधार मिटवला आहेस तू... 
लख्ख प्रकाश भरला आहेस तू आमच्यात... 
सगळ्या पायवाटा स्वच्छ केल्या आहेस तू... 
 
न मागताही भरपूर दान दिलं आहेस तू...
 
निरोप देतो तुला...
 
शुभास्ते पंथानः सन्तु...
 
लवकर ये परत... वाट बघतो !
 
जाता जाता एक प्रार्थना करतो...
 
आम्हां प्रत्येकाच्या मनामनात सदैव तेवत राहा...

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नयनरम्य ताम्हिणी घाट