Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Joke: न्हाव्याने असे काय म्हटले की बंडोपंत कासावीस झाले

व्हॉट्स अॅप मेसेजे मराठी
, शुक्रवार, 25 एप्रिल 2025 (11:36 IST)
बंडोपंत खूप वर्षांनी गावी आपल्या घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर दाढी करायला म्हणून ते बाहेर पडले. गावात फेरफटका मारतांना त्यांना असे दिसले की, गाव अजूनही खूप मागासलेलं आहे. गावात कुठलीही दुकानं नव्हती. माणसेही तुरळकच दिसत होती, तीही म्हातारी. 
 
एका गल्लीच्या तोंडाशी एक मोडकं लाकडी टेबल, त्यावर एक तुटका आरसा आणि एक खुर्ची दिसली. गिऱ्हाईक आल्याचे पाहून "या साहेब," म्हणत न्हाव्याने बंडोपंतांचे स्वागत केले व विचारले,
"दाढी करायची की केस कापायचेत ? गावात नवीन दिसताय !" 
बंडोपंत म्हणाले, 
"हो. कालच आलो. दाढी करायचीय." 
 
न्हाव्याने दाढी करायला सुरुवात केली. परंतु बंडोपंतांचे गाल खपाटीला गेलेले असल्याने दाढी काही व्यवस्थित होईना... शेवटी न्हाव्यानेच आयडिया दिली. खिशातून एक गोटी काढून बंडोपंतांना देत न्हावी म्हणाला,
"ही गोटी दात आणि गाल ह्यांच्या मध्ये दाबून धरा. म्हणजे गाल वर येतील आणि दाढी चांगली होईल." 
 
त्याप्रमाणे बंडोपंतांनी आळीपाळीने दोन्ही बाजूच्या दात आणि गाल ह्यांच्या मध्ये गोटी दाबून धरली...आणि काय आश्चर्य...दाढी एकदम मस्त गुळगुळीत झाली. 
 
खेडवळ न्हाव्याची ही युक्ती बंडोपंताना खूपच आवडली. ते खूप खूष झाले. न्हाव्याला म्हणाले,
"बरं झालं ऐनवेळी तुमच्याकडे गोटी होती म्हणून." 
न्हावी म्हणाला,
"ती रोजच खिशात ठेवावी लागते." 
 
बंडोपंत आश्चर्याने म्हणाले,
"का ? रोज का ?" 
न्हावी म्हणाला,
"त्याचं काय आहे...गावात सगळे म्हातारेच आहेत. सगळ्यांनाच गोटी द्यावी लागते दाढी करतांना. म्हणून रोज खिशात ठेवावी लागते." 
 
बंडोपंत काळजीत पडले. म्हणाले,
"म्हणजे ? तुम्ही सर्वांसाठी ही एकच गोटी वापरता ?" 
न्हावी म्हणाला,
"हो...मग काय करणार ? प्रत्येकासाठी रोज नवीन गोटी कुठून आणणार ?" 
 
बंडोपंतांचा चेहरा उतरला. ते कसेबसे म्हणाले,
"समजा चुकून कोणी गोटी गिळली तर ?" 
न्हावी दिलखुलास हसला आणि म्हणाला,
"हो...हो...असं होतं बऱ्याच वेळा." 
 
आता मात्र बंडोपंतांचा चेहरा बघण्यासारखा झाला. कासावीस होऊन त्यांनी विचारले, 
"बापरे...मग ?" 
न्हावी म्हणाला,
"मग काय साहेब, आमचे गावकरी कितीही गरीब असले तरी प्रामाणिक आहेत. चुकून जरी ही गोटी गिळली तरी दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र न विसरता आणून देतात. " 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रितेश देशमुखच्या चित्रपटाचे शूटिंग करणाऱ्या डान्सरचा नदीत बुडून मृत्यू