भलत्या वेळी दरवाजावर थाप पडली ..
तिने धावत येवून दरवाजा उघडला
बाहेर पाहते तो दारात यम उभा दिसला
त्याला पाहून ती गोड हसते ...
असा अचानक मध्येच कसा आलास ..
असे यमालाच विचारते,
तो म्हणतो मी तुला न्यायला आलोय
चल लवकर आवर .....
ती म्हणते....
जरा आत ये बघ तर माझे घर,
आता बाळाचे बाबा येतील,
आले की, कुठे आहेस ग तू म्हणत, घरभर फिरतील ...
त्यांचे माझ्याशिवाय पान हलत नाही,
त्यांचेच काय सारे घरच माझ्याशिवाय
अजिबात चालत नाही ....
तिथे पलीकडे बघ ...
तिथे माझे सासू सासरे असतात,
दोघेही थकलेत आता सारखे
आजारी पडतात ......
त्या दोघांचे सगळे मीच करते,
त्या दोघांमध्ये मी माझे आई बाबा पाहते.
आता माझी चिमणी बाहेरून
खेळून दमून घरी येईल
आई ,आई भूक लागली म्हणत
घर डोक्यावर घेईल ..
हल्ली न इकडून तिकडून आली कि
मला घट्ट मिठी मारते ...
आई मी मोठी झाली न
कि अगदी तुझ्यासारखी होईन म्हणते ..
ते पाळण्यातले बाळ आत्ता उठेल,
चिमण्या मुठी हलवीत ...
भुकेने रडून गोंधळ करेल ..
बाळ नुसते मी समोर गेले तरी लगेच शांत होतो .
गुलाम फार लबाड झालाय हल्ली
सारखा घेवून बस म्हणतो ...
तूच सांग मी गेल्यावर
या सगळ्यांचे कसे होईल
माझ्या वाचून पोरक्या झालेल्या
माझ्या पिलांना कोण माया देईल ..
अरे बस कर यमा किती रडशील ..
माझ्या ऐवजी तूच इथे हाय खावून मरशील ..
म्हणुनच जे सांगते ते नीट ऐक
पुन्हा अशी चूक करू नकोस,
कोणत्याच आईला
अशी अवेळी नेवू नकोस ....
कोणत्याच आईला
अशी अवेळी नेवू नकोस ....