मन नको प्राजक्ताच्या फुलासारखे
प्रभाती सडा टाकून मोकळे होणारे
क्षणभरासाठी टवटवी लेविणारे..!!
मन नको निशिगंधासारखे
केवळ सांजेच्यावेळी घमघमणारे
काळवेळ पाहून उमलणारे..!!
मन नको रात राणीसारखे
मंत्र मुग्ध करणारे क्षणात विरणारे
खिडकीबाहेरच दरवळणारे..!!
मन नको मोगऱ्यासारखे
केवळ मोसमात बहरणारे
बहरासाठी ऋतूची प्रतीक्षा करणारे..!!
मन नको गुलाबासारखे
सुंदरतेसोबत काटे बाळगणारे
जवळ येणाऱ्याला ओरखडणारे..!!
मन असावे बकुळेच्या फुलासारखे
ना सुंदर दिसणारे परी घमघमणारे
ना देखावा करणारे, सदैव बहरणारे
कोणत्याही रुपात टवटवीत दिसणारे
सुकले तरीही सुगंध जपणारे
खरंच
मन असावे बकुळ फुलासारखे
बाह्यरुप बदलले तरी
अंतरी हिरवेपण सदैव जपणारे..!!