सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

बुधवार, 2 जानेवारी 2019 (15:28 IST)
सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे
अशा सासुबाई प्रत्येक सुनबाईस मिळो..... 
 
सुनबाईस......
नको जाउ धास्तावून
सासुरवासाच्या दडपणाने
अग मीही गेलेय भांबावून
सुनरवासाच्या कल्पनेने
 
नको आणूस रूखवतात
भांडीकुंडी मोठी मोठी
भातुकलीचा खेळ आण
चुल बोळकी बार्बी छोटी
 
स्वच्छ कोवळ निरागस
त्या वेळचं मन आण
लहान होऊनच शिकवेन तुला
मनापासून सारं जाण
 
जाणून घे परंपरा 
आवडी निवडी रितीभाती
फार काही वेगळं नसतं
सांभाळून घे नातीगोती
 
इथे तुला रुजण्यासाठी
माझ्यातली हळवी माया देईन
तुझ्या बहरण्या फुलण्याची
मनापासून काळजी घेईन
 
विस्तारुदेत स्वप्नील हिरव्या 
फांद्या तुझ्या बहारदार
विसावूदेत त्यांच्या सावलीत 
घर आपले हळूवार
 
माझी अधुरी स्वप्ने सखे
तुलाच पुर्ण करायची आहेत
मी काढलेल्या रांगोळीत आता
रंग तुलाच भरायचे आहेत
 
पाळणाघर वृध्दाश्रम
संस्था दुरच राहूदेत
मुलाबाळात रमता रमता
स्वर्गाचेच दार उघडूदेत
 
तळहाताच्या फोडाप्रमाणे
जपेन तुला आई होऊन
राहशील ना ग राणी माझी 
सुन नाही लेक होऊन
 
तुझ्या आई बाबांच्या चिंतेने
नको होऊस अशी गंभीर 
त्यांची काळजी घेण्याकरता
लेक माझा आहे ना खंबीर....

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं प्रदर्शित