बायको नवऱ्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली.
डॉक्टर, "काय होतंय?"
बायको, "काही नाही डॉक्टर, सकाळी फेसबुकवर एक पोस्ट केली यांनी.. आणि तेव्हापासून त्यांना अस्वस्थ वाटायला लागलंय.."
डॉक्टर, "कशामुळे? काही आक्षेपार्ह कंटेंट होता का?"
बायको, "नाही हो, जो शब्द उच्चारताच येणार नाही, त्यावर पोस्ट कसली टाकतील हे?"
डॉक्टर, "मग काय प्रॉब्लेम आहे? डिटेलमध्ये सांगा"
बायको, "त्याचं काय झालं डॉक्टर. सकाळी जागे झाले की यांना चहा लागतो.."
डॉक्टर, "अहो, इतकं पण डिटेल नको.. कामाचं तेवढंच सांगा.."
बायको, "अहो कामाचंच सांगतेय, ऐका तर! तर सकाळी नेहमीप्रमाणे यांनी चहा घ्यायच्या आधी फेसबुकवर एक पोस्ट टाकली. साधारण चहा संपेपर्यंत २५-३० लाईक्स, या अश्या येऊन जातात नेहमी यांना.. खूप फेमस आहेत बरं हे फेसबुकवर... पण आज चहा संपला तरी एकही लाईक नव्हता.."
डॉक्टर आश्चर्याने बोलला, "काय? मग?"
बायको, "मग काय, फुटला ना यांना घाम ऐन थंडीत.. एसी वाढवला.. आणि त्यांना म्हटलं, अहो एवढया सकाळी नसेल उठलं कुणी, येतील लाईक्स, जरा दम धरा.. तर मला म्हटले, 'अशी सवय नाहीये गं, कसंसंच होतंय.. सांगता येणार नाही नेमकं..' मग मीच म्हटलं.. एक काम करा फोन राहू द्या इथेच, तुम्ही जरा मोकळ्या हवेत एक चक्कर मारून या.. अर्ध्या तासात जरा तुम्हालाही बरं वाटेल आणि तोवर बरीच मंडळी उठलेलीही असतील.."
डॉक्टरने स्टेथोस्कोप काढून बाजूला ठेवलं आणि विचारले, "पुढे काय झालं मग..?"
बायको बोलली, "इच्छा नव्हती त्यांची, पण तयार झाले आणि गेले बाहेर फिरायला.."
आता डॉक्टरला चांगलाच इंटरेस्ट यायला लागला होता, त्याने विचारले, "मग पुढे?"
बायको बोलली, "पुढे काय? पुढे मी भाजी टाकायला घेतली, डबे असतात ना रोज आणि त्यानंतर घर झाडायला...."
डॉक्टर वैतागून त्यांना थांबवत म्हणाला, "अहो म्हणजे त्यांचं काय झालं? बाकीचं सगळं रुटीन स्कीप करून सांगा.."
बायको नाक मुरडत पुढे बोलली, "मग काय, आले ते परत आणि बघतात तर काय.. चाळीस मिनिटात एकही लाईक नाही.. पडले की सोफ्यावर आडवे.. पुन्हा घाम.. छातीत दुखतंय वगैरे म्हणू लागले.. डोळ्यांसमोर अंधारी येतेय, असेही म्हणत होते. नंतर थोड्यावेळ बेडवर आडवे झाले.. कशीबशी आंघोळ केली आणि नको नको म्हणताना परत नोटिफिकेशन्स चेक करायला घेतले आणि पुन्हा तेच... मला बाई काही कळलं नाही.. घाबरून गेले.. एकटी बाई काय करणार अश्या वेळी? तडक उठून रिक्षात बसवून आणलंय त्यांना.."
डॉक्टर पेशंटकडे पाहत म्हणाले, "पाहू.."
बायकोने नाडी तपासण्यासाठी नवऱ्याचा हात पुढे केला.
डॉक्टर म्हणाले, "अहो मोबाईल द्या त्यांचा.."
बायकोने नवऱ्याचा मांडीवरचा हात उचलून त्याच्या फिंगरने फोन अनलोक करून डॉक्टरकडे दिला आणि हात फतकन परत मांडीवर सोडून दिला. डॉक्टरने फेसबुक ओपन करून पोस्ट पाहिली. अजूनही लाईक आलेला नव्हता. डॉक्टरने मागच्या काही पोस्ट्स पाहिल्या. दोनशे आणि तीनशे लाईक्सच्या खाली एकही पोस्ट नव्हती. मग त्यांनी त्या पोस्टचं एनेलिसिस केलं आणि लक्षात आलं की चुकून त्या पोस्टचं सेटिंग ओन्ली मी आहे.
हे लक्षात येताच तो जोरात ओरडला, "Oh my god, this is a serious case of Gabbarisbackomania.."
बायको घाबरत म्हणाली, "फार सिरियस असतं का ओ हे..?"
डॉक्टर म्हणाले, "सिरियस? अहो फार सिरियस, पण घाबरू नका..मी कशाला आहे?"
डॉक्टरने एक औषध दिले, हळूच पोस्ट सेटिंग पब्लिक केली आणि म्हणाला, "हे घ्या, हे औषध घ्या, जरा महाग आहे, पण तुम्ही घेतलं की लाईक्स सुरू होतात की नाही बघा.."
बायको खुश झाली आणि म्हणाली, "अहो पहा काय म्हणतात डॉक्टर, हे औषध घेतलं की लाईक्स सुरू होतील.. फारच मनाला लावून घेतलंय हो यांनी"
खुर्चीत रेलून बसलेला नवरा कसाबसा पुढे सरकला आणि औषध घेऊन जागेवर बसत म्हणाला, "साधारण किती वेळाने सुरू होतील लाईक्स आणि कॉमेंट्स..?"
डॉक्टर फोन त्यांच्या हातात सोपवत, त्याकडे नजर टाकत, लाईक्स सुरू झाल्याची खात्री करून घेत म्हणाला, "बस्स.. दोनच मिनिट वाट पहा आणि चेक करून बघा.."
इकडच्या तिकडच्या गप्पांत दोन मिनिटे गेली.
"डॉक्टर पाहू का ओ आता?" बायको म्हणाली.
"हो हो.. एव्हाना सुरू व्हायला हवं.." डॉक्टर फिंगर्स क्रॉस करून म्हणाले..
बायकोने फोन पाहिला आणि किंचाळलीच, "अय्या हो की, चक्क पन्नास लाईक्स?"
हे ऐकून नवरा ताडासारखा सरळ झाला आणि बायकोच्या हातातला मोबाईल अक्षरशः खेचत घेऊन पाहू लागला. त्याच्या डोळ्यात नकळत दोन आनंदाश्रू तरळत होते. त्याला खूप काही बोलायचं होतं, तो डॉक्टरकडे पाहतही होता, पण त्याला नेमके शब्द सुचत नव्हते.
त्याने खूप प्रयत्न केला, पण तरीही तो काही बोलू शकला नाही. तो त्याचा 'कल हो ना हो' चा शाहरुख मोमेंट होता. फक्त तोंड वेडेवाकडे करत, आकाशाकडे पाहत, डोळ्यांनीच त्याने डॉक्टरचे आभार मानले डोळे पुसले आणि पाकीट काढून डॉक्टरच्या समोर ठेवलं.