Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बायकोच महत्त्व

बायकोच महत्त्व
, गुरूवार, 15 सप्टेंबर 2016 (16:25 IST)
प्रिय बायको,

तू माहेरी गेल्यापासून घर खायला येतंय वगैरे काहीच्या काही विधानं मी करणार नाही (कारण तसं तू फ्रिजमध्ये बरंच काही ठेवलेलं असल्यामुळे मीच घर खातोय असं म्हणलं तरी चालेल) जोशीबाईंकडून काल आणलेला पोळीभाजीचा डबा घेतल्यावर उद्या हा घासून परत दिलात तरच परवा देईन असं म्हणाल्याने नाईलाजाने तो घासावा लागला (मोलकरणीने तिच्या घरासमोरच्या सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त दांडी मारलेली आहे), डबा घासता घासता चहाचा कप, इतर भांडीही सिंकवरच घासली.

डेटॉलचं डिशवॉशर चांगलं आहे पण तुझी पाठ अधुनमधुन का दुखते ते मला आज समजलं. सिंकवर सतत वाकून भांडी घासणं थोडं त्रासदायक आहे.

आनंदाची गोष्ट म्हणजे दूध उतू जाता जाता शेवटच्या क्षणी चपळाईने गॅस बंद केला म्हणून वाचलं...पण त्यामुळे हॉलमधुन किचनपर्यंत येणं, गॅस बंद करुन दुध झाकून ठेवण्यात माझे तब्बल एकशेबारा सेकंद गेल्याने सिनेमातला एक महत्वाचा शॉट गेला...असो....
मला कशातही लागतं म्हणून आठवणीने Chill Trey मध्ये तू ठेवलेलं ओलं खोबरं आता सुकल्याने इन्स्टंट पोह्यांवर घेऊनही मजा आली नाही...

तू कष्टाने खोवलेल्या, ताज्या ओल्या खोबऱ्याचं महत्व मला आज समजलं.
तू जपून ठेवेलेलं सायीचं दही मी काल रात्री संपवलं त्याबद्दल क्षमस्व...पण तुझ्या करड्या पहाऱ्याशिवाय ते संपवताना फारशी मजाही आली नाही हे ही मी मान्य करतो...
मला दिसणार नाही अशा पध्दतीने फ्रीजमध्ये ठेवेलेले खारे पिस्ते मला सापडलेच शेवटी, पण ते काढण्याच्या भानगडीत त्याच्या समोर ठेवलेलं दुधाचं भांडं  धक्का लागल्याने फ्रीजमध्येच आत्महत्या करुन मोकळं झालं, ते साफ करताना माझ्या नाकी नऊ आले पण मी फ्रीज पुर्ववत साफ केला आहे, त्या त्रासापायी मला बरेचसे पिस्त खवटही लागले.
गाद्यांना कव्हर्स आणि उशांना अभ्रे घालण्याचं एक जबरदस्त काम तू माझ्यासाठी सोडून गेली होतीस त्याबद्दल तुला दंडवत. अक्षरश: घामाघूम झालो मी हे करताना.
ऑफिसमधुन आल्यावर एकही चुणी नसलेलं बेडशीट मला इतके दिवस दिसायचं त्यामागचे तुझे परिश्रम मला आज समजले...
ऍब्स किंवा क्रंचेस हा व्यायाम घरचा केर काढण्यासमोर "नथिंग" आहे असं मला आज पटलं...
आज एका दमात लिविंग रुम, बेडरुम व किचनचा केर काढल्याने एकाच सिटिंगमध्ये ऍब्स,क्रंचेस व कार्डियो झाल्याचा फील आलेला असल्याने आज संध्याकाळी (एरव्हीच चंद्रदर्शनाच्या भानगडीमुळे घराबाहेर पडायचे नसल्याने तंगड्या लांब करुन सिनेमा बघणार आहे) तू अधुनमधुन माहेरी गेल्याने, तुझ्या गैरहजेरीत मला तुझ्या कष्टांचं मुल्य समजतं हे त्रिकालाबाधित सत्य असल्याने व ते मला कळावं यासाठीच मी कधीही तुझ्या माहेरी जाण्यासाठी आडकाठी करत नाही हे तू मान्य करशील.
असो. तिथून येताना सासुबाईंच्या हातचे उकडीचे मोदक आठवणीने घेऊन ये...सर्वांना नमस्कार.
गणपतीबाप्पा मोरया...

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

क्रिश रुपातली गणेश आणि हृतिकचा 'क्रिश 4'