Publish Date: Tue, 12 Aug 2014 (15:33 IST)
Updated Date: Tue, 12 Aug 2014 (15:39 IST)
एक अगदी निराश दिसणारा प्राणी त्या दिवशी एका साहेबी हॉटेलात शिरला. त्याचा चेहराच काय खांदेही साफ पडलेले होते आणि तो भकास दिसत होता. तो एका टेबलापाशी बसल्यावर तिथली वेट्रेस त्याच्याजवळ आली. 'मला दगडासारखी कठीण अशी दोन अंडी, दोन संपूर्णपणे कोळसे झालेले पावाचे तुकडे आणि थंडगार चहाचा एक कप घेऊन ये,' त्याने सांगितले.
त्या वेट्रेसने ही चमत्कारिक ऑर्डर ऐकून साहेबी पद्धतीप्रमाणे आपले खांदे उडवले, पण तरी करते काय? मुकाट्याने आत जाऊन ती सर्व वस्तू घेऊन आली. 'हं साहेब, आणखी काय पाहिजे?' तिने विचारले. 'आणखी काही नाही. आता तू फक्त माझ्यासमोर बस आणि माझ्या कपाळाशी कसली तरी कटकट कर सतत. माझं डोकं उठलं पाहिजे. काय समजलं!' आणि यावर ती वेट्रेस जेव्हा आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहू लागली, तेव्हा त्याने सांगितले, 'प्लीज, मला घरची फार आठवण येतेय गं.'