गणपती म्हणून सुपारीची पूजा का करतात ?
, शनिवार, 17 मार्च 2012 (16:19 IST)
प्रत्येक शुभकार्यात गणेशाला प्रथम पूजेचा मान आहे. गणपती म्हणून सुपारीची प्रतिष्ठापना करून त्याची पूजा केली जाते. असे करण्यामागे स्मृतिगं्रथात काही उल्लेख आढळतात. या ग्रंथात म्हटल्याप्रमाणे सुपारी हे पूर्ण फळ आहे. कुठल्याही प्रकारची पोकळी नसलेले हे फळ आहे. प्राचीन काळी सत्य युगात ऋषी-मुनी आपल्या साधनेने देवांचे ध्यान करून त्यांना आवाहन करत असत. त्या तपश्चर्येमुळे देव प्रकट व्हायचे. मात्र, कलियुगात हे शक्य नाही. मानवाला पूर्वीप्रमाणे आराधना करणे शक्य नसल्याने कुठल्याही पूर्ण फळाची प्रतिष्ठापना केल्यास त्यात देवता वास करेल, असे पुराणात सांगितले आहे. त्यामुळे तांदळाच्या राशीवर सोळा उपचाराने सुपारीचे पूजन केल्यास त्यामध्ये देवता वास करते, असा विश्वास आहे. तांदूळ हे देवाचे अन्न असल्याने ते पवित्र मानले जाते. कुठल्याही शुभकार्याप्रसंगी, पूजेच्या वेळी तांदळाच्या राशीवर सुपारीची प्रतिष्ठापना केली जाते. त्या सुपारीला ध्यान, आवाहन, आसन अर्घ्य, पंचामृत स्नान, गंधोदक स्नान, सुमंगलस्नान, पुष्पस्नान, हिरण्यस्नान, शुद्धोदक स्नान या पद्धतीने त्या सुपारीवर उपचार करून, सुपारीची प्रतिष्ठापना केली जाते. तसेच मंत्रोच्चाराने त्या देवतेला बोलावले जाते. त्या आराधनेच्या बळावर त्या पूजेत आपला लाडका बाप्पा सुपारीच्या रूपात तिथे हजेरी लावतो