कुशीत तू येता बाळा, विसरते कष्ट जीवनाचे
तु्झ्या लोचनीचे अश्रु पुसते, प्रेमाचे अंजन घालते
काँ अश्रु येतात बाळा, काय तुला मनी वाटते
तुझ्या प्रेमाचा हात शिरी फिरता
दाटुन येतात वेदना मनीच्या
कस सांगु आई तुजला, ऐकटे-पणाची यातना
बालपण असे ठेवा अमृताचा, आईच्या प्रेमासाठी
देव सुद्धा जन्म घेती, पण हे सुख न लाभे मजला
रोज नऊ वाजता तु मला, सोडते पाळणाघरी
आईच्या हाते गोड अन्न, भरवते कोणी बाई दुसरी
होता आठवण अंगाईची, येते डोळ्यात पाणी
आई-आई करत झोप येते, मला त्या पाळणाघरी
तुझे दु:ख मला समजे, काय करू बेटा पोट
कर्तव्या कडे सारते, मी पण अशीच दु:खी होते
तुझी आठवण येता, कासावीस होते
कसा असेल बाळ माझा, ह्या प्रश्नांनी मन घायाळ होते
पण कर्तव्यासाठी बाळा, मातृत्वाला दूर सारते
तुझी भाग्यरेषा घडवताना, तुझ्या पासूनच दूर होते
इतके कष्ट करूनही बाळा, सायंकाळी रोज स्वजनांचे
अपशब्द ऐकते, आपल्या प्रालब्धाला दोष देऊनी
पुन्हा माझ्या मार्गी लागते, दोघं ही आपण एक सारखे
तु ही ऐकटा मी ही ऐकटी, दिवस भराच्या श्रमाचे ना
मुल्यांकन होते, केवळ आपली माया दूर होते
प्रालब्धा मागे न कोणाचे चालते, कशा सांगु तुला माझ्या वेदना
त्या साठी बाळा आई व्हावे लागते.