Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अकबर-बिरबल कथा : हे तुझेच डोके ना ?

अकबर-बिरबल कथा : हे तुझेच डोके ना ?

वेबदुनिया

कासम नावाचा नोकर नवीनच नोकरीवर लागला होता म्हणून त्याच्या बुद्धीची परीक्षा घ्यावी, ह्या उद्देशाने झोपेतून उठताच बादशहा त्याच्याकडे पाहून ओरडला, ''जल्दी बुलाव!'' 

आता जल्दी बुलाव, म्हणजे ताबडतोब बोलावून आण, एवढे त्या कासमला समजले,पण कोणाला बोलावयाचे? हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला. पण हा प्रश्न बादशहाला विचारता येत नव्हता, म्हणून कासम धावत-पळत प्रथम बिरबलाकडे गेला व त्याला बादशहाच्या आज्ञेचा आशय विचारला.

त्यावर बिरबल कासमला म्हणाला, ''काय रे,तुला जल्दी बुलाव, असे जेव्हा खाविंदांनी सांगितले, तेव्हा ते उभे होते का बसले होते? आणि त्यांच्या हाताची हालचाल कशी होती?''

कासम म्हणाला, ''जेव्हा ती आज्ञा त्यांनी मला दिली, तेव्हा ते बसले होते आणि आपला उजवा हात ते आपल्या वाढलेल्या दाढी-मिशांवरून फिरवीत होते.''

यावर बिरबल म्हणाला, ''असे ना? मग तू खुशाल केस कापणाराला त्यांच्याकडे पाठव. दाढी करून आणि मिशा कोरून ते कुठे तरी तातडीने बाहेर जाणार असतील.''

कासमने अशा प्रकारे केस कापणार्‍याला बादशहाकडे पाठवून तोही त्याच्या मागून बादशहाकडे गेला, बादशहा त्याला म्हणाला, ''कासम, मी तुला फक्त जल्दी बुलाव, असेच सांगितले, तरी तू नेमका याला घेऊन कसा काय आलास? हे तुझेच डोके ना?''

त्यावर कासम म्हणाला, ''हजूर, खरं बोलायचं तर, डोके माझेच, पण त्याला अकलेचा पुरवठा बिरबलजींच्या मेंदूने केला.''

Share this Story:

Follow Webdunia marathi