एका माणसाकडे बरेच सामान, दागदागिने, शेतीवाडीही होती. परंतु तो त्याचा उपभोग न घेता फक्त संपत्ती जमवीत असे. एक दिवस त्याच्या मनात आले, आपली ही सर्व मालमत्ता विकून आलेल्या पैशांतून एक मोठी सोन्याची वीट तयार करून घ्यायची आणि ती जमिनीत पुरून ठेवायची. म्हणजे लोकांचे लक्ष आपल्या संपत्तीकडे जाणार नाही. लगेच त्याने त्याप्रमाणे करून एक मोठी जड सोन्याची वीट तयार केली आणि ती आपल्या घरासमोर एका खड्यात पुरून ठेवली. मात्र रोज सकाळ संध्याकाळ तो जमीन उकरून सोन्याची वीट त्या जागी सुरक्षित आहे का ते पहात असे. त्यातच त्याला समाधान मिळे. आपण फार मोठ्या संपत्तीचे मालक आहोत हीच गोष्ट त्याच्या मनाला समाधान देई.एक दिवस खड्डा खणताना आणि बंद करताना त्या कंजूष माणसाला एका दुसर्या माणसाने पाहिले. त्याचे कुतूहल जागृत झाले. एक दिवस सगळीकडे सामसूम होताच त्याने खड्डा खरून आत डोकावले. सोन्याची वीट पाहून त्याचे डोळेच दिपून गेले. त्याला संपत्तीची हाव सुटली. त्याने ती वीट काढून घेऊन त्या जागी एक मोठा दगड परून ठेवला.
दुसर्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे त्या कंजूष माणसाने आपली सोन्याची वीट जागेवर आहे का ते पहाण्यासाठी खड्डा खणला. परंतु खड्ड्यात वीट नव्हती. त्याजागी एक मोठा दगड होता. आपली संपत्ती चोरीला गेलेली पाहून तो ऊर बडवून रडू लागला. त्याचा आवाज ऐकून एक साधू तिथं आला. त्याने त्या कंजूष माणसाला खूप समजावले. तो म्हणाला, ''मित्रा, तू तुझ्या संपत्तीचा उपभोग तर घेत नव्हताच तेव्हा आता हा दगडच तुझी संपत्ती आहे असं समजून त्याच्याकडे पहा आणि समाधान मानून घे. कारण उपभोग न घेता तशीच जमिनीत न ठेवलेली सपंत्ती दगडासमानच असते.''