Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गोनूची गोष्ट : बाल कथा

गोनूची गोष्ट : बाल कथा
, मंगळवार, 28 ऑक्टोबर 2014 (15:14 IST)
मिथिला नगरीत राहणार्‍या गोनूच्या हुशारीमुळे राजाची त्याच्यावर अतिशय मर्जी बसली होती. दरबारातल्या काही जणांना हे सहन होत नव्हते. अशांपैकी एक असलेला असूयानंद शास्त्री हा एकदा राजाच्या कानात कुजबुजला, 'महाराज, तसे पाहता चातुर्यात आम्ही इतर दरबारी मंडळीही काही कमी नाही, पण गोनूप्रमाणे उठल्या-बसल्या आपल्या चातुर्याचे प्रदर्शन करणे आम्हाला आवडत नसल्याने आपली मर्जी त्या गोनूवर कारण नसता जडली आहे. गोनू जर खरोखरच चतुर असेल, तर चिंचोळय़ा तोंडाच्या साधारण मोठय़ा मडक्यात बरोबर मावेल एवढय़ा आकाराचा काळा भोपळा ते मडके न फोडता भरून दाखवायला त्याला सांगा.'
 
शास्त्रीबुवांच्या सुचनेनुसार एके दिवशी राजा गोनूला म्हणाला, 'गोनू, अद्यापपर्यंत मी तुला बरीच इनामे दिली, पण आता मला तुझ्याकडून एक भेट हवी आहे. ते बघ तिथे चिंचोळय़ा तोंडाचे मडके व मध्यम आकाराचा काळा भोपळा आहे. तू ते मडके न फोडता त्या मडक्यात तो भोपळा भरून आणून दे. माझी मागणी सामान्य आहे ना? करशील ती पूर्ण तू?'
 
गोनू म्हणाला, 'का नाही पुरी करणार? अवश्य करीन, पण सध्या मी एका धार्मिक ग्रंथाचे पारायण करायला घेतले असल्याने येत्या दोन-तीन महिन्यांत मला कशी ती सवड नाही. त्या पारायणातून मोकळा झालो रे झालो की, आपल्याला हवी असलेली भेट मी घेऊन येईन, मात्र तोवर ते मडके मी माझ्या घरी नेऊन ठेवून येतो, म्हणजे मला आपल्या मागणीचा विसर पडणार नाही.'
 
आपली विनंती राजाने मान्य करताच गोनू ते मडके घेऊन घरी गेला. त्याच दिवशी कुणाच्या लक्षात येणार नाही अशा तर्‍हेने ते मडके झाकून घेऊन तो जवळच असलेल्या खेड्यातील एका ओळखीच्या शेतकर्‍याकडे गेला. त्याच्या झोपडीच्या गवताने शाकारलेल्या छपरावर काळय़ा भोपळय़ाचा वेल चढला होता व त्या वेलावर मूठ मूठ आकाराचे कोवळे कोवळे भोपळे लागले होते.
 
स्वत: गोनू त्या मडक्यासह त्या छपरावर चढला आणि त्याने एक मूठभर आकाराचा भोपळा त्याच्या वेलासकट त्या पक्क्या मडक्याच्या चिंचोळय़ा तोंडातून आत ढकलला. एवढे झाल्यावर त्याने त्या शेतकर्‍याला ती गोष्ट पूर्णपणे गुप्त ठेवायला सांगून त्याचा निरोप घेतला.
 
तो भोपळा प्रतिदिवशी मडक्यातल्या मडक्यात थोडाथोडा वाहू लागला. त्याच्यावर नजर टाकण्यासाठी गोनू आठवड्यातून एक फेरी त्या शेतकर्‍याकडे मारत होताच. दोन-अडीच महिन्यांत जेव्हा त्या भोपळय़ाने त्या मडक्याचा बहुतांश अंतर्भाग व्यापून टाकला, तेव्हा 'आता अधिक दिवस हा भोपळा अशाच स्थितीत राहू दिला, तर हा मडके फोडून टाकेल, असा विचार करून गोनूने तो देठात कापला आणि एके दिवशी तो ते मडके दरबारात घेऊन गेला.
 
आपण दिलेल्या पक्क्या मडक्याचे तोंड एवढे चिंचोळे असताना त्यात एवढा मोठा भोपळा गोनूने कसा घातला? असा पेच राजापुढे पडला. त्याने गोनूला 'तू हा चमत्कार कसा केलास?' अशी पृच्छा केली. आपण अवलंबिलेल्या युक्तीची कल्पना गोनूने देताच राजा त्याच्यावर प्रसन्न झाला. त्याला १,000 मोहरा देत तो त्याला म्हणाला, 'गोनू, या तुझ्या चातुर्यावर प्रसन्न होऊन मी तुला १,000 मोहरा तर देत आहेच, शिवाय तुझ्यावर जळणार्‍या ज्या असूयानंद शास्त्रांनी तुला या पेचात टाकण्याचा मला सल्ला दिला, त्या शास्त्रीबुवांनीही तुला ५00 मोहरा द्याव्यात, अशी मी त्यांना आज्ञा करीत आहे.'

Share this Story:

Follow Webdunia marathi