Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चतुर ससा

चतुर ससा
फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक घनदाट जंगल होते. तेथे अनेक प्रकारचे प्राणी रहात होते. एक म्हतारा सिंह जंगलाचा राजा होता. तो म्हतारा झाल्यामुळे त्याला शिकार करायला जमत नव्हते. त्याने जंगलातील सर्वांना सांगितले, की माझ्या गुहेत रोज एक प्राणी पाठवायचा.

त्याप्रमाणे सिहाच्या गुहेत रोज एक प्राणी पाठविण्यात येऊ लागला. एके दिवशी सशावर पाळी आली. ससा हुशार होता. त्याने सिंहाचा काहीतरी बंदोवस्त करायचे ठरविले. ससा ठरलेल्या वेळेपेक्षा खूप उशीरा सिंहाच्या गुहेत पोहोचला.

ससा फार उशीरा आल्यामुळे सिंहाला कडाडून भूक लागली होती. तो सशावर रागावत म्हणाला, तू एवढ्या उशीरा का आलास? ससा नम्रपणे म्हणाला, 'महाराज मला यायला उशीर झाला, कारण वाटेत दुसर्‍या सिंहाने मला अडविले. त्याच्यापासून सुटका करून घेणे फार अवघड होते.'

दुसरा सिंह आणि तो ही या जंगलात? सिंहाने रागाने विचारले. 'होय महाराज,' ससा म्हणाला. सिंहाने त्याला तेथे घेऊन जाण्यास सांगितले. ससा सिंहाला घेऊन एका विहिरीपाशी आला व म्हणाला, 'महाराज दुसरा सिंह इथे आत राहतो. इकडे या आणि वि‍हिरीत डोकावून पाहा.'

सिंहाने विहिरीत डोकावून पाहिले. त्याला पाण्यात स्वत:चेच प्रतिबिंब दिसले. ते प्रतिबिंब म्हणजे दुसरा सिंहच आहे, असा त्याचा समज झाला. त्याने मोठ्याने गर्जना केली. त्याबरोबर पाण्यातील सिंहानेही गर्जना केली.

आता मात्र सिंहाचा राग अनावर झाला. त्याने रागाच्या भरात विहिरीत उडी मारली आणि तो पाण्यात बुडून मरण पावला.

उपदेश- शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ

Share this Story:

Follow Webdunia marathi