Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तात्पर्य कथा : बाह्य रूपावर जाऊन फसू नये

तात्पर्य कथा : बाह्य रूपावर जाऊन फसू नये
, सोमवार, 1 डिसेंबर 2014 (15:03 IST)
एका रानातल्या खडकावर दोन घोरपडी उन्ह खात बसल्या असता, त्यापैकी एकजण दुसरीस म्हणाली, 'आमची स्थिती मोठी शोचनीय आहे! आम्ही फक्त जिवंत आहोत एवढेच, बाकी सगळय़ा जगात आमच्याकडे कोणी ढुंकूनही बघत नाही. आमच्या क्षुद्रतेचा धिक्कार असो! यापेक्षा रानातल्या वार्‍यासारख्या उड्या मारणार्‍या हरणाचा जन्म मिळाला असता तर काय मजा आली असती!' हे बोलत असतानाच एका हरिणामागे लागलेल्या शिकारी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकू आला व धावून थकलेल्या हरणाचा जीव कुत्र्याने घेतलेला तिने प्रत्यक्ष पाहिला. त्यावेळी दुसरी घोरपड आपल्या स्थितीविषयी कुरकुरणार्‍या पहिल्या घोरपडीस म्हणाली, 'ज्या हरणाचे जीवन आपल्याला मिळावे अशी इच्छा तू करीत होतीस त्या हरणाची स्थिती किती भयंकर आहे, हे आता प्रत्यक्षच पाहा अन् ज्या मोठेपणाबरोबर अनेक दु:खेही भोगावी लागतात, तो मोठेपणा देवाने आपणास दिला नाही याबद्दल त्याचे आभार मान!'
 
तात्पर्य - बाह्य रूपावर जाऊन फसू नये. कारण त्याच्या अंतर्यामी दु:ख असण्याचीच शक्यता असते.

Share this Story:

Follow Webdunia marathi