Kids story: श्रीकृष्णाच्या बालपणीच्या लीला संबंधित अनेक रंजक कथा आहे. अशीच एक कथा आहे कालिया नागाची. श्रीकृष्णाने आपल्या लीलेने कालिया नागाचा अभिमान तोडला होता.
एकदा कालिया नागाने यमुनेला आपले घर बनवले आणि आपल्या विषाने यमुना नदीचे पाणी विषारी केले. ते पाणी प्यायल्यानंतर पशू, पक्षी, गावातील लोकांचा मृत्यू व्हायला लागला. एकदा आपल्या मित्रांसोबत खेळत असताना श्रीकृष्ण यमुना नदीच्या काठी पोहोचले आणि खेळता खेळता त्यांचा चेंडू अचानक नदीत पडला. आता सगळ्यांना यमुना नदीचे पाणी आणि त्यात राहणारा कालिया नाग माहीत होता. त्यामुळे मृत्यूच्या भीतीने कोणीही नदीत जाण्यास तयार नव्हते.
तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की मी चेंडू आणतो. सर्व मुलांनी त्यांना नदीत जाण्यापासून रोखले, पण त्यांनी ऐकले नाही आणि त्याने नदीत उडी मारली. सर्व मुले घाबरली आणि घरी आली. तसेच यशोदा मैय्याला कन्हैयाने नदीत उडी मारल्याबद्दल सांगितले. हे ऐकून यशोदा मैय्या घाबरल्या आणि रडू लागल्या. ही बातमी हळूहळू संपूर्ण गोकुळधाममध्ये वणव्यासारखी पसरली. आता गोकुळवासी यमुना नदीच्या काठी आले, पण कृष्ण अजून पाण्यामधून वर आले न्हवते. कृष्णाला नदीत आलेले पाहून कालिया नागाच्या पत्नीने त्यांना परत जाण्यास सांगितले. कृष्णाने ऐकले नाही. आता मात्र कालिया नाग जागा झाला. कृष्णाने कालिया नागाला यमुना नदी सोडण्याचा आदेश दिला, परंतु कालिया नागाने नकार दिला आणि कृष्णावर हल्ला केला. कृष्ण आणि कालिया नागा यांच्यात घनघोर युद्ध झाले. काही काळानंतर, कालिया नागाचा पराभव झाला आणि कृष्ण त्याच्या फणावर चढून फडावर नृत्य करू लागले. व पाण्यामधून वर आले. सर्वांनी हे दृश्य पाहिले. कालिया नागाने आपला जीव वाचवण्यासाठी कृष्णाची प्रार्थना केली. मग कृष्णाने त्याला त्याच्या जागी परत येण्यास सांगितले. कालिया म्हणाला की गरुड मला तिथे मारेल, मी तिथे कसा जाऊ? यावर कृष्ण म्हणाले की माझ्या पायाच्या खुणा तुझ्या फणावर आहे, ते पाहून गरुड तुला मारणार नाही. यानंतर कालिया नाग आपल्या पत्नींसह आपल्या ठिकाणी गेले. कृष्णाला सुखरूप परत मिळाल्याने सर्वांना खूप आनंद झाला आणि गोकुळमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
Edited By- Dhanashri Naik