एकदा एक शिकारी हरणाची शिकार करण्यासाठी अरण्यात गेला. खूप शोधाशोध करून त्याने एक हरीण मारला व त्याला घेऊन तो परत येऊ लागला. वाटेत त्याला दिसला एक रानडुक्कर. शिकार्याने हरिण खाली ठेवला व एक बाण मारून त्या रानडुकराला ठार केले. पण रानडुकरानेही त्याच वेळी प्रचंड गर्जना करून त्या शिकार्याल ा जोरात धडक मारून ठार मारले. अशा रीतीने शिकारी आणि रानडुक्कर दोघेही मरून पडले.
थोड्याच वेळाने एक कोल्हा भक्ष्य शोधत शोधत तेथे आला. तो हरिण, शिकारी व रानडुक्कर असे तिघेही तेथे मरून पडलेले पाहून त्या कोल्ह्याला अतिशय आनंद झाला. तो स्वत:शीच म्हणाला, ''अरे वा:वा: ! आज काय भाग्याचा दिवस आहे! माझ्या नशिबाने केवढी मोठी मेजवानी आज माझ्यपुढे ठेवली आहे! कुणीतरी म्हटलं आहे ते अगदी खरं आहे. 'माणसाच्या ध्यानीमनी नसता त्याच्यावर जशी दु:खे येतात तशी सुखेही येतात. दैवलीला अगाध आहे! आता कितीतरी दिवस आपल्याला पोटभर मांस खायला मिळेल. आता या क्षणी तरी मला अतिशय भूक लागली आहे. तेव्हा प्रथम कुणाचे बरे मांस खावे? त्यापेक्षा असं केलं तर? या बाणाला डुकराचे बेचव स्नायू लागलेले आहेत ते प्रथम खावे. मग पुढचं पुढे पाही!''
असा विचार करून त्याने बाणाला लागलेले मांस काढून घेण्यासाठी एक जोरात हिसडा मारला. त्याच क्षणी तो बाण उडून त्याच्या पोटात घुसला आणि तो कोल्हा तेथेच मरून पडला.
खरंच आहे, मनुष्याने लोभ धरावा पण त्याचा अतिरेक करू नये. अति हव्यास मनुष्याच्या नाशाला कारणीभूत होतो.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा