''अमेय, अमेया कुठे आहेस तू? आणि हे काय, घरात अंधार करून काय बसलास? तुला बरं वाटत नाही का? मावशी स्वयंपाक करून गेल्या का? '' स्वत:शी बडबडत चारी खोल्या फिरून झाल्या पण स्वारीचा काही पत्ता नाही. मित्राकडे गेला असेल. फ्रेश होते अन फोन करते.
कधी कधी डोक्याला अगदी ताप करतो हा मुलगा. तरी त्याला नेहमी समजावते, बाळा संध्याकाळचा कुठे जात जाऊ नकोस, घरीच राहतं जा.
मावशी स्वयंपाक करून साधारण सहा वाजता जातात. साडेसात ते आठच्या दरम्यान मी येतेच आता ऑफिस म्हटलं की कधी साडेआठ नऊही होतात. अमोलंच मात्र नक्की नसतं. इथे असला तर नऊ वाजेपर्यंत येतो. परदेशी टूर असला तर आठ ते दहा दिवस तो बाहेरच असतो. पण अमेय करता न चुकता महागडी खेळणी, कपडे घेऊन येतो. त्याच्याकडे व्हिडियो गेम्स, नवनवीन खेळणी एवढी जमली आहेत की अमेयाचे मित्र त्याचा हेवा करतात.
तरी या मुलाला म्हणे करमत नाही. संध्याकाळचे दीड दोन तास तो उदास असतो. एकदा का मी घरी आले की कळी खुलते. आज जरा उशीरच झाला. बरोबरीच्या मैत्रिणी काय बोलत होत्या काही कळत नव्हतं. डोक्यात अमेयाचे विचार घोंघावत होते. काय करत असेल? कार्टून पाहत बसला असेल का गाडीनं खेळत असेल? काही खाल्लं असेल का? की दमून पेंगायला आला असेल? पण घरात अमेय नसेल ही कल्पनाच सहन होत नाही.
मित्राकडे फोन करून पाहावा, म्हणून फोनकडे गेले तर खाली एका कागद ठेवलेला - मी आजी आबांकडे जातोय - अमेय.
हातपायातलं बळंच संपलं. डोळ्यांपुढे अंधार दाटला. अशी सुन्न होऊन किती वेळ बसले होते कुणास ठाऊक! फोनची बेल सारखी वाजत होती म्हणून रिसव्हर उचलला तर तिकडून आबा बोलत होते - ''सोनल, अमेय सुखरूप पोहचला काळजी करू नको. शांत हो. त्याला काही बोलू नको. एक दोन दिवसांनी त्यालाच सांगतो तुझ्याशी बोलायला. ''
आबांच्या फोननं खूप धीर आला. अमेय सुखरूप आहे, यात मला सगळं मिळालं. पण असा का वागला हा? कधीच कुठे एकटा न गेलेला अमेय मुरूडपर्यंत एकटा कसा गेला असेल? दहा वर्षाचा झाला, पण अमोलनं कधी त्याला साध्या कारनं सुद्धा फिरवलं नाही. नेहमी ए. सी. गाडीने आम्ही गणपतीला मुरूडला जातो. शाळेची बस घराशी थांबते. हा एस. टीनं गेला असेल का? एस. टी. स्टॅण्डपर्यंत कसा पोहचला असेल?
एकीकडे त्याच्या हिमतीची दाद द्यावीशी वाटत होती तर दुसरीकडे रागही येत होता. हे असलं वेडं धाडस केल्याबद्दल चांगला दम द्यावासा वाटत होता. काही विपरीत घडलं असतं तर? कसं कळत नाही या मुलाला की तुला नसतं खरचटलं तर ममाला चांगली मोठी जखम होते रे!
विचारांचे धन दाटून आले आणि अश्रूंच्या वर्षावात पत्रातली अक्षर धूसर दिसू लागली. अश्रूंत हसू म्हणतात हे हेच असेल का? अमेयच पत्र! माझा अमेय पत्र लिहिण्याइतका मोठा केव्हा झाला? हा माझ्यातल्या आईचा प्रश्न झाला, खरा प्रश्न असा की त्याला पत्र लिहावंस का वाटलं, पण या प्रश्नाच उत्तर पत्र वाचल्यावरच मिळेल.
ममा,
रागावलीस माझ्यावर? तुला न सांगता निघून आलो म्हणून? पण न कळवता मात्र आलो नाही बरं. फोन खाली लिहून ठेवली होती चिठ्ठी. तू तिकडे बाबांना कळवलं असलेच अमेरिकेला. बाबांना तक्रारही केली असेल, अगदी ऐकत नाही हा मुलगा, याच्याकरता एवढं करा, याला त्याचं काही वाट नाही, वगैरे.
तुला प्रश्न पडला असेल नं मी इतपर्यंत कसा आलो? अगं सोपं आहे ते. फोननं चौकशी केली तर कळलं बोरीवली ईस्ट म्हणजे स्टेशनच्या पलीकडून एसटी सुटते डायरेक्ट मुरूडकरता संध्याकाळी साडे सहा वाजता. ती साडेआठ ते नऊच्या दरम्यान मुरूडला पोहचते. मग काय, मावशी गेली अन बॅगेत चार कपडे भरले, पैसे घेतले आणि पायीच निघालो. एक दोनदा विचारावंही लागलं पण, समोर स्टेनश दिसलं आणि हायसं वाटलं. जीना चढून तिकडे उतरलो आणि खूप बस उभ्या होत्या. बस नंबर विचारून तिकिट घेतलं अन बसलो एस. टीत. एस. टीच्या प्रवासात काय गंमत असते ममा, तू एकदा असा प्रवास करून बघ. खिडकीतून काजवे पाहण्याची मजा आपल्या ए. सी. गाडीतून कधीच येत नाही.
मुरूडला उतरलो तर एक आबांनी विचारलं, कोण बाळ तू? कोणाकडे जाणार? 'सोमणाकडे' म्हटल्यावर लगेच म्हणाले - ''बबन्या सोमणाचा नातू का रे तू? चल सोडतो. आणि एकटा कसा आला? वेळ नसेल बापाला, हो नं.? दिलं बसवून गाडीत. '
घराशी आल्यावर बाहेरूनच त्या आबांनी आरोळी ठोकली, ''बबन्या, तुझा नातू आलाय रे, सांभाळ! '' आणि आबा बाहेर येईपर्यंत ते पुढे गेले सुद्धा!
''कोण कोण'' म्हणत आबा फाटकाशी आले आणि मला पाहून आ वासून उभे राहिले. मग आजीला आवाज दिला, ''अग ए, बघ आपला बाबू आलाय एकटा! भाताची मूठ आणि पाणी घेऊन ये ओवाळायला.''
आजीच्या कुशीत शिरलो ममा, तर आजीच्या पातळाला गायीच्या गोठ्यात येतो वास येत होता. हिंग, जिरे कसला कसला वास येत होता. पण तुम्ही मोठी माणसं! ते सुख म्हणजे ब्रह्मांडाचं वगैरे काही म्हणता न ते खरं आजीच्या कुशीत असतं.
आबांना खूप काळजी वाटली. तुझ्या आईला सांगितले का? तिनं एकटं कसं पाठवलं तुला? काही झालं असतं तर? सोन्या, असं वेडं धाडस का केलं? आई रागावली का? किती तरी प्रश्न. 'आबा, मला तसं काही सांगता येणार नाही, पण कंटाळा आला अन फोनखाली आईकरता चिठ्ठी ठेवून निघून आलो, ' बस!
''असं करू नाही राजा! अरे, तुझा बाबा अमेरिकेला कामानं गेलाय. आई तुझं किती करते आणि तू असा वागतो''. आजीनं आबांना पुढे बोलूच दिलं नाही, ''राहू द्या हो, पोर एवढं दमून आलाय. चल बाळा, हात-पाय धू आणि गरम भात जेवून घे. तुला मेतकूट भात आवडतो नं? वाढते चल. ममा खरं सांगू? शेजारच्या फ्लॅट मधल्या आजीला गुंडांनी मारलं न तेव्हा पासून मला भीती वाटते, मावशी सहा वाजता जातात. तू आठ-साठे आठ पर्यंत येते कधी तर तुला नऊसुद्धा वाजतात. मग घर खायला उठतं, अभ्यास करावासा वाटतं नाही, कार्टूनसुद्धा पाहायची इच्छा होतं नाही केवढी खेळणी आहे माझ्याकडे की माझे मित्र हेवा करतात पण मी त्यांच्याकडे ढुंकून ही पाहत नाही, बाळ गीतांच्या केवढ्यातरी सीडी तू आणल्या माझ्या करता पण मला काही ऐकायला आवडत नाही, सारखी भीती वाटते कोणी तरी येईल आपल्याला मारेल. आपण दार उघडलं नाही तर तो दार फोडून आत येईल. मग मुकाट्यात कोपऱ्यात बसून असायचो, आबांनी शिकवलेली रामरक्षा म्हणतं तरी खूप रडू यायचं. शेवटी परवा निघून आलो, तुला विचारलं असतं तर तू येऊ दिलं नसतं आपण सुट्टीत जाऊ म्हणाली असती.
इथे खूप छान वाटतं, आजीच्या कुशीत भीती कुठल्या कुठे पळाली बघ, ममा इथं सकाळ, अशी छान होते आपल्या परसातल्या माडावर खूप पक्षी किलकिलं करत असतात, आजी दुधाची धार काढते आणि पेला भरून दूध प्यायला देते, दुधाची मिशी आली की पातळाच्या पदरात तोंड पुसते.
आबा पोहायला तळ्यावर घेऊन जातात. आपले आबा किती छान पोहतात गं ममा? पप्पाला येतं का असं पोहता? संध्याकाळी आजी खूप तूप लावून गरम भाकरी जेवायला देते. काय छान लागतेगं? ममा आपले वडा-पाव वाले अशी भाकरी का नाही बनवत गं? रात्री आबा झोपाळ्यावर घेऊन बसतात खूप गोष्टी सांगतात ममा इथे एवढं मोठं आभाळ आहे आणि ते ही चांदण्यांनी गच्च भरलेलं, आपल्या घराच्या खिडकीतलं आभाळ फारच इवळसं आहे आणि एवढ्या चांदण्या मुंबईला नसतात का गा?
आबांना चांदण्याची नावं त्यांच्या कथा पण माहीत आहेत, ते मला सांगतात पण ती तिथं त्यांच्या माण्डीवर आडवा होतो पण रात्री मी आजीच्या गोधडीत असतो. तिचा सुरकुतळेला हात मला थोपटतं असतो. तिच्या कथेतरच मी राजकुमार असोत ममा चंगला शूरवीर, राजनिष्ठा शुभ्रघोड्यावर स्वार होऊन चांदण्यात फिरणारा मग वर आभाळ अजून मोठं होतं कधी न संपणार स्वप्नात फिरायला पण जाग येते, आणि हो एक सांगायचं राहीलच की आजी रोज संध्याकाळी माझी दृष्ट काढते.
ममा आपण आजी, आबांना मुंबईत बोलवून घेऊ का? आजीची गाय तिच वासरू सगळं सगळं घेऊन येऊ.
तुझा - अमेय
माझा अमेय खरंच मोठा झाला की परिस्थितीने त्याचं बालपण हरवलं अन मोठं केलं? काही ही असू शकतं, आजी, आबा त्यांची गाय तिचं वासरू सगळं आणता येईल रे बाळा पण एवढं मोठं आभाळ कसं आणणारं? अमेरिकेहून तुझ्या बाबाला रोबोट आणत येतो विजेवर चाळणाऱ्या गाड्या, जहाज सगळं आणता येतं पण आभाळ ज्याचं त्याचं वेगळे असतं रे बाळा ते कुठून आणता येतं नाही, हे कळेल तेव्हा तू खरा मोठा झालेला असशील.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा