तिळाची करामत
सौ. सरिता रत्नाकर सुरत्राण
एक होता वाटाणा, एक होता फुटाणा आणि एक शेंगदाणा. त्या तिघांची खूपच दाट मैत्री होती. कुठेही जायचे तर तिघे मिळून जायचे. तिघे मिळून राहायचे.
त्या तिघांची शाळापण एकच, वर्गपण एकच. त्यामुळे ते एकमेकांपासून कधी लांब गेलेच नाही.
त्यांच्याशेजारी एक तीळ रहात होता. त्याचे घर वेगळे इवलेसे. त्याची शाळापण वेगळी. तो तीळ या मित्रांच्यात कधी मिसळालाच नाही.
वाटाणा नेहमी या तिळाकडे बघून टणाटणा बोलायचा, हसायचा फुटाणा त्याला साथ देऊन तिळाला धक्का बुक्की करायचा आणि शेंगदाणा मोठ्या माणसासारखा कायम त्या तिळाला रागवायचा, ओरडायचा.
तीळमात्र सगळं सहन करायचा. शांत बसून विचार करायचा, हे तिघे असे कसे? सगळ्यांना त्रास देतात. मला रडवतात असं का बरं?
मग तिळ गेला देवाकडे, '' गणपती बाप्पा मला इतकां लहान का केलेस? मी इतका लहान म्हणून वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा हसतात. मला वाटेत लुडबुड करू नको म्हणुन रागवतात. मला त्यांच्या मैत्रीत घेत नाहीत. बाप्पा तू सांग ना मी काय करू?''
तिळाचे बोलणे ऐकून गणपती बाप्पा मनातल्या मनात हसला, आणि म्हणाला, ''तिळा हे बघ प्रत्येक जण आपल्यापरीने मोठा असतो. तू इवलासा दिसतोस, पण तुझ काम खूप मोठं आहे. ते तुला माहीत नाही. वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा जरी मोठे असेले तरी आकाराने फक्त मोठे आहेत. त्यांचं मन मोठ नाही. बघ तू वेळ आली की कळेलच तुला. आता घरी जा आणि शांतपणे बस, खेळ झोप. आणि बरंका, मोठ्या माणसाचे ऐक. एवढे बोलुन बाप्पा गुप्त झाला.
तिळाला काही समजलेच नाही. आता आपण मंदिरात बाप्पाशी बोलत होतो. बाप्पा चांगला बोलला आणि आता कुठे काय? मंदिरात फक्त बाप्पाची मुर्तीच दिसते आहे.
तरी पण तो मुकाट्याने घरी आला. आपलं इवलंस काम करून तो इवल्याशा गादीवर झोपी गेला.
इकडे काय झाले, जेव्हा सण येऊ लागले तेव्हा टणाटणा बोलणारा, उड्या मारणारा वाटाणा गुपचूप घरातच बसला. शेजारी राहणारी माणसे त्याला कधीतरी बोलवीत. कधीतरी मौजेखातर त्याला तांदुळात घालून त्याचा भात करायचे तर कधी करंजी, उसळ. बस्स संपले त्याचे मोठे पण.
श्रावणातले शुक्रवार असेल की फुटाण्याला विचारीत बोलवत असत. मग फुटाण्याशिवाय शेजार्यांना चैन पडत नसे.
शेंगदाणा मात्र सारखा जयचा सगळ्यांकडे त्याला कढईत घालून भाजायचे. त्याचा कूट करायचे. त्याचे तेल काढायचे. उपवासाला कूट, शेंगदाणे खात. पण जास्त येणे जाणे वाढले की, शेंगदाण्याला घरीच बसायला सांगत. सारखे येऊ नको, त्रास होतो, असे म्हणत.
शेंगदाणा म्हणत असे, माणसे असे का वागतात. मी चांगला उपयोगी पडतो. निमूटपणे स्वत:ला कुटून घेतो वाटाणा फुटाणा यांच्या सारखे कधीतरी उपयोगी पडतो किंवा मदत करतो असेही नाही.
आणि काय झाले, काही दिवसांनी संक्रांत आली. आईची, ताईची, काकूची, आत्याची गडबड सुरू झाली.
आई म्हणे ताईला, '' ताई - ताई, थंडी चांगलीच पडली आहे दुकानात जाऊन मसाल्याचे सामान घेऊन ये थंडीत मसाला लवकर आणि छान बारीक होतो. आणि तीळ मात्र भरपूर आण. मला तिळाची खमंग चटणी करायची आहे मसाल्यात तीळ घातल्या शिवाय काय मसाल्याला चव येणार? आणि हो तीळगूळ करायचा आहे. हलवा करायचा आहे.''
आईचे बोलणे ऐकून ताई धावतच दुकानात गेली. काकू, आत्या यांनी माना डोलावल्या तीळ पाकांत घालून हलवा करायची त्यांना अति हौस होती.
तीळ आपल्या घरात बसून हे सगळे बोलणे ऐकत होता आणि आनंदी होत होता. त्याला बाप्पाचे बोलणे आठवले. मग कळले, इवलेसे असून आपण किती महान आहोत?
आईने, काकूने शेगडी चांगली रसरसून तापवली होती आणि शेजारीच साखरेच्या पाकाचे पातेले ठेवले होते. एका वाटीत तीळ ठेवले होते.
वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा अगदी घाबरून गेले आता या तिळाचे काय होणार? खूप रडेल नाही कां!
त्याला कोण वाचवणार?
पण तीळ अगदी खुशीत होता. आज आपण चांगल्या कारणा करता मदत करतोय याचा त्याला आनंद वाटला.
आईने वाटीतले तीळ शेगडीवरच्या तापलेल्या परातीत टाकले आणि त्याच्यावर पाक पण थोडा ओतला.
आणि ती हाताने हलवा करू लागली.
तिळाच्या मनात आले, आहा~~~ किती मायेचा स्पर्श आईच्या हातांचा. आई, ताई हलवा हलवत आहेत. त्यांना भाजत नाही. गरम जाणवत नाही. मग आपण इवलेसे असून सुद्धा उपयोगी पडतो आहे, याचा मला आनंद होत आहे. उद्या हाच हलवा आणि तिळाची वडी घेऊन माणसे एकमेकाला गोड बोलायला सांगतील. भांडणं संपतील तोंड गोड होईल. मग कशाला वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचे?
त्या तिघांनाही तिळाचे मोठेपण कळले आणि ती गप्प बसली.
अशी असते इवल्याशा तिळाची करामत.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा