Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

थापाडे माकड

थापाडे माकड
WDWD
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. एक जहाज काही प्रवाशांना घेऊन अर्थन्सकडे चालले होते. या प्रवाशांपैकी एक माकड होते. जहाज किनार्‍यापासून बरेच जवळ आले होते. परंतु एकाएकी समुद्रात प्रचंड वादळ होऊन जहाज पाण्यात बुडाले. जहाजातील माणसे समुद्रात फेकली गेली. त्यात माकडही होते. समुद्रात पडल्या बरोबर माकड हातपाय हालवून पोहू लागले. एका देवमाशाने त्याला पाहिले. हा माणूसच आहे असे समजून देवमाशाने त्याला पाठीवर घेतले आणि तो किनार्‍याकडे निघाला.

जाता जाता देवमाशाने त्याला विचारले, ''काय रे, तू अथेन्सचा रहिवासी आहेस का?'' ''हो तर, अथेन्समध्ये आम्ही मंडळी खूपच नावाजलेली आहोत. आमच्या पूर्वजांनी अथेन्ससाठी कितीतरी बहुमोल कार्य केले आहे. अथेन्सच्या इतिहासात त्यांचे नाव मोठे आहे,'' माकड अभिमानाने सांगू लागले.

बोलता बोलता देवमाशाने विचारले, ''तुला पिराईस माहीतच असेल.''

हो हो तर, पिराईस अथेन्समधील एक प्रसिध्द व्यक्ती आहे. शिवाय हा पिराईस माझा जिवलग मित्र आहे. अथेन्सला पोहोचताच मी प्रथम त्याची भेट घेणार आहे. आम्ही दोघांनी बरीच वर्षे एकत्र काम केले आहे. माकड आणखी आणखी थापा मारीत होता आणि देवमासा गालातल्या गालात हसत होता. कारण पिराईस अथेन्समधील प्रसिध्द बंदराचे नाव असून त्याच बंदराजवळ जहाज बुडाले होते. देवमासा त्याला पिराईस बंदराकडेच घेऊन चालला होता. माकडाचा थापाडेपणा पाहून याला आपल्या पाठीवरून नेण्यात काहीच अर्थ नाही असा देवमाशाने विचार केला आणि त्याला तिथंच सोडून देवमासा पाण्याखाली अदृश्य झाला. पुन्हा माकड पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. त्याच्या थापाड्या स्वभावामुळे त्याच्यावर पुन्हा संकट ओढवले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi