Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बांबूतील राजकन्या

सौ. मिना हुन्नुरकर

बांबूतील राजकन्या
फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. क्यो तो या जपानच्या जुन्या राजधानीच्या जवळच्या एका गावात एक आजोबा आणि एक आजी राहत होती. ऐके दिवशी नेहमीप्रमाणे आजोबा घराच्या पाठीमागे असलेल्या बांबूच्या बनात बांबू तोडायला गेले. तेव्हा त्यांना चमचम करत असलेला एक चमत्कारिक बांबू दिसला. आजोबांनी तो बांबू सावकाशपणे कापून बघितला, तो त्यातून एक अतिशय सुंदर मुलगी बाहेर आली. आजोबांनी त्या मुलीचं नाव 'कागुयाहिमे' असे ठेवले कारण ती लाकडातून निघालेली राजकन्या होती. आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट अशी झाली की आजोबा जो तो बांबू कापायचे त्या त्या बांबूतून पैसे पडू लागले. पाहता पाहता आजोबा आजी खूप श्रीमंत झाले.

हळूहळू 'कागुयाहिमे' सुद्धा मोठी होऊ लागली. शिवाय ती असामान्य सुंदर दिसू लागली. ही बातमी पाहता पाहता राजधानीत जाऊन पोहोचली.

एके दिवशी राजधानीतून पाच चांगली प्रतिष्ठित माणसे कागुयाहिमेच्या घरी आली. त्यांनी कागुयाहिमेशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. कागुयाहिमेने कितीही नाही म्हटले तरी ते पाच जण रोज न बोलवता तिच्या घरी येत राहिले. शेवटी कागुयाहिमेने तिला हव्याशा वाटणाऱ्या पाच वस्तूंपैकी कोणतेही एक मूल्यवान वस्तू घेऊन येणाऱ्या व्यक्तीशी लग्न करेन असे सांगितले.

प्रथम एका श्रीमंत माणसाच्या मुलाला तिने पऱ्यांच्या राज्यातील डोंगरावरच्या एका मौल्यवान झाडाची फांदी आणायला सांगितले. त्याने गुपचुप त्या फांदीसारखी दिसणारी नकली फांदी करून आणली. ती फांदी मोठ्या अभिमानाने तो दाखवत असताना ज्या कारागिरांनी ती फांदी बनविली होती ते कारागीर तेथे आले आणि 'आमचे पैसे द्या' असे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्याचे पितळ उघडे पडले.

नंतर ओतोमो नावाचा एक जण आला. त्याला कागुयाहिमेने ड्रॅगनच्या गळ्यातील रत्न आणायला सांगितले. ओतामो एका चांगल्या दणकट जहाजात बसून निघाला. पण हाय! एका मोठ्या वादळात तो सापडला, 'समुद्रदेवा, ड्रॅगनच्या गळ्यातील मौल्यवान रत्न आणावे असे म्हणत होतो पण चांगली शिक्षा दिलीस बाबा! ''

असे म्हणून ओतोमो त्या रत्नाचा नाद सोडून पळून गेला.

मग आला असोनोकामी नावाचा एक तरुण, कागुयाहिमेने त्याला टियवीची अंडी आणायला सांगितले. इसोनोकामीच्या नोकरांनी त्याला मासे गोळा करायच्या टोपलीत बसवून जोरात टिटवीच्या घरट्याकडे ढकलले. 'अरे पोले' असे वाटत असतानाच अचानक दोर तुटून खाली डोके वर पाय अशा अवस्थेत तो जमिनीवर पडला.
उरलेले दोघे तरुणही अयशस्वी झाले.
तोपर्यंत कागुयाहिमेची कीर्ती सम्राटापर्यंत जाऊन पोचली होती. त्याने तिला राजवाड्यात आणायचे ठरवले. तेव्हा काय आश्चर्य! कागुयाहिमे अचानक दिसेनाशी झाली. मग सम्राटाने क्षमा मागितली तेव्हाच ती पुन्हा दिसू लागली. ही काही साधीसुधी मुलगी नाही हे सम्राटाच्या लक्षात आले. अन तो राजधानीला परत गेला.
शरद ऋतू सुरू झाल्यावर एके दिवशी कागुयाहिमे चंद्राला पाहून रडू लागली. आजी आजोबांनी खोदून खोदून विचारल्यावर तिने कारण सांगितले. ती म्हणाली, 'मी चंद्रलोकातील आहे. 'या शरद पौर्णिमेला रात्री मला न्यायला चंद्रावरचे लोक येणार आहेत. मला त्यांच्याबरोबर जावेच लागणार म्हणून मला दु:ख होतंय.' हे ऐकून आजी आजोबाही रडू लागले.

आजोबांनी सम्राटाला विनंती केली की, त्याने शरद पौर्णिमेच्या रात्री कागुयाहिमेचे रक्षण करावे.

आजीबाईंनी घराची अगदी आतल्या बाजूला असलेल्या खोलीत कागुयाहिमेला लपवून ठेवले. आजोबा देखील खोलीला कुलूप लावून आकाशाकडे डोळे लावून बसले.

सम्राटाचे सैनिक घराच्या भोवती आणि छपरावर तलवारी, धनुष्य आणि भाले घेऊन तयार होते.

सरतेशेवटी चंद्र वर आला. चंद्रावरचे लोक ढगांवर आरूढ होवून आले होते. सम्राटाचे सैनिक शस्त्रास्त्रे घेऊन पुढे सरसावते तो काय! सगळ्यांच्या डोळ्यांपुढे अंधारी आली. हालचाल करणे तर दूरच साधे हाक मारणेसुद्धा जमले नाही.

कागुयाहिमेला न्यायला आलेल्या पऱ्या घराच्या जवळ येऊ लागल्या. तो काय आश्चर्य! घरे आपोआप उघडू लागली. कागुयाहिमे बागेत आली. पऱ्यांनी आणलेला किमोने तिने घातला. आजी आजोबांचा निरोप घेताना ती म्हणाली, 'तुम्ही माझ्यासाठी खूप केलेत. मनापासून मी तुमचे आभार मानते.'

पऱ्यांनी हात दिल्यावर ती हळूहळू आकाशात उडू लागली. चंद्राच्या रथात बसून ताऱ्यांबरोबर उंच उंच जाऊ लागली. आजी आजोबा बराच वेळ रडत रडत तिला निरोप देत होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi