हि गोष्ट आहे जर्मन देशातील. तेथील एका गावात एक शेतकरी राहत होता. त्या शेतकर्याकडे एक गाढव हते. ते रोज शेतकर्याकडे ओझे वाहण्याचे काम करत असे. बरेच दिवस गेले ते गाढव आता म्हातारे झाल्यामुळे त्याला ओझी वाहणे फार कठीण जात असे. त्यामुळे शेतकरी रोज त्याला मारहाण करीत असे. मग ते गाढव फार दु:खी कष्टी होत असे. त्या गाढवाच्या मनात आले! की इथे मार खाण्यापेक्षा जवळच ब्रेबीन नावाचे शहर आहे. आपण तेथे जाऊन तेथील लोकांना गाणे म्हणून दाखू असा विचार करून गाढव शेतकर्याच्या घरातून बाहेर पडून ब्रेबीन शहराकडे जाण्यास निघाले.रस्त्यांनी जात असताना त्याला एक कुत्रा भेटतो. गाढव कुत्र्याजवळ जाऊन त्याला विचारतो. ''अरे! तू असा दु:खी कष्टी का आहेस?'' कुत्रा म्हणतो, 'मी तरुण होतो, मी घराची राखण करीत होतो. चोरांना पकडून देत होते. पण आता मी म्हातारा झालो आहे, म्हणून, मला घराची राखण करता येत नाही. चोरांना पकडता येत नाही, म्हणून घरमालक मला घरातून हाकलून देणार आहे. याकरिता मी दु:खी कष्टी आहे.' गाढव त्याला म्हणतो, ''तू माझ्याबरोबर येतोस का?'' कुत्रा म्हणतो, ''कुठे?'' अरे आपण ब्रेबीन शहरात जाऊन तेथील लोकांना गाणे गाऊन दाखवू. मग तेथील लोक आपल्याला खावयास देतील. हे ऐकल्यावर मोत्या त्याच्या त्याच्या बरोबर जाण्यास तयार होतो. गाढव पुढे व कुत्रा मागे रस्त्याने जाऊ लागले.
जाता जाता त्यांना एक दु:खी कष्टी मांजर दिसते. गाढव व मोत्या मांजरीकडे जाऊन म्हणतात, ''का गं मनीताई, तू अशी दु:खी कष्टी का आहेस?'' त्यावर मांजर म्हणते, ''मी म्हातारी झाले आहे. तरुण असताना उंदरांना पकडून खात होते. म्हणून उंदीर घरातच येत नव्हते माझ्या भीतीने. पण आता उंदराच्या मागे धावतायेत नाही. त्यांना पकडून खाता येत नाही आणि मालकीण सुद्धा माझा सारखा राग राग करते. त्याचे मला फार वाईट वाटते. म्हणून मी फार दु:खी कष्टी आहे.'' हे सर्व ऐकल्यावर गाढव, मोत्या तिला म्हणतात, '' तू आमच्याबरोबर येतेस का? आम्ही ब्रेबीन शहरात जाणार आहे. तेथील लोकांना गाणे गाऊन दाखविणारं आहे.'' दु:खी कष्टी मांजर मनात विचार करते. इथे रोज मार खाण्यापेक्षा आणि मालकिणीने पण आपला रोज रोज राग राग करण्यापेक्षा आपण ह्या दोघांबरोबर गेलेले केव्हाही चांगले, असा विचार करून ती त्या दोघांना हो म्हणते. मग तिघे जण ब्रेबीन शहराकडे जाण्यास निघतात.
ते रस्त्यावरून बोलत बोलत जात असतात. मग त्यांना एक छोट्याशा झाडावर दु:खी कष्टी होऊन कोंबडा बसलेला दिसतो. ते तिघे जण त्या कोंबड्याकडे जाऊन विचारतात, ''अरे मित्रा! असा तू दु:खी कष्टी का आहे?'' त्यावर कोंबडा म्हणाला, ''मी आता म्हातारा झालो आहे. तरुणपणी मी सकाळी लवकर उठत असे. पहाट झाली की मोठ्यांना आरवत असे. पण आता हे सर्व माझ्याच्याने होत नाही कारण मी म्हातारा झालो आहे.
त्यामुळे मालकीण आज मला मारणार आहे. माझे चिकन त्यांच्याकडे येणार्या पाहुण्यांसाठी करणार आहे. हे ऐकून मला फार वाईट वाटले म्हणून मी दु:खी कष्टी आहे. त्यावर गाढव कोंबडेदादाला म्हणतो, ''हे बघ आम्ही तिघे पण म्हातारे झालो आहोत. आम्ही ब्रेबीन शहरात जाऊन तेथील लोकांना गाणे म्हणून दाखविणारं आहोत. तू आमच्या बरोबर येतोस का?'' हे ऐकून कोंबडा खूप खूश होतो व त्यांच्या बरोबर जाण्यास तयार होतो.
अशा तर्हेने चौघेजण ब्रेबीन शहराकडे जाण्यास निघतात. जाता जाता त्यांना एक छोटेसे जंगल लागते. सूर्य मावळला होता. संध्याकाळ झाली होती. सगळीकडे हळूहळू काळोख होऊ लागला होता. हे सर्व पाहून गाढव आपल्या मित्रांना म्हणतो, ''अरे मित्रांनो, आजची रात्र आपण येथेच काढून पहाट झाली की परत पुढच्या प्रवासाला जाऊया.'' मग ते चौघे एका झाडाखाली बसले असताना गाढवाचे लक्ष जंगलातल्या घराकडे जाते. आणि घरात एक दिवा दिसत होता. ते पाहून गाढवाला खूप खूप आनंद होतो. तो सर्वांना म्हणतो, ''अरे अरे मित्रांनो, पाहिलं का ते घर! मला वाटते की शहर आता खूपच जवळ आलेले दिसते.चला तर आपण त्या घराकडे जाऊन पाहूया. त्या घरात कोण आहे? जर कोण राहतं असतील तर आपण प्रथम त्यांनाच गाऊन दाखवू म्हणजे आपल्याला ते काहीतरी खायला देतील. असा विचार करून, सर्व जण त्या घराकडे येतात. त्या घरात दिवा दिसतो आणि बोलण्याचा आवाज पण येत असतो. पण घराचा दरवाजा बंद असतो. ते सर्व विचारात पडतात. काय करावे ह्यावरच सर्व जण विचार करतात. तेवढ्यात गाढव म्हणतो, ''खिडकी फार उंच नाही. आपण प्रथम खिडकीतून पाहू. मग त्यांना गाणे गाऊन दाखवू.'' सर्व जण हो म्हणतात.
गाढव म्हणतो, ''मी प्रथम खाली उभा राहतो, माझ्यापाठीवर कुत्रा उभा राहिल, कुत्र्याच्या पाठीवर मांजर उभी राहिल, आणि शेवटी मांजरीच्या पाठीवर कोंबडा उभा राहिल त्याने त्या घरात खिडकीतनू पाहिल्यावर मग आपण काय ते ठरवू. असे म्हणून प्रथम गाढव उभा राहतो गाढवाच्या पाठीवर कुत्रा उभा राहतो कुत्र्याच्यापाठीवर मांजर उभी राहते व मांजरीच्या पाठीवर कोंबडा उभा राहून घरात पाहतो, त्याला एक मोठे जेवणाचे टेबल दिसते त्या टेबलावर खूप खाद्य पदार्थ ठेवलेले असतात. चार माणसे खुर्चीत बसून एकमेकांशी बोलत बोलत जेवण करीत असतात. हे सर्व कोंबडा सगळ्यांना सांगतो.
गाढवाला खूप खूप आनंद होतो. तो म्हणतो, ''चला आपण आपल्या गाण्याची सुरुवात ह्या ठिकाणापासूनच करू.'' असे म्हणून ते सर्व जण गाणे म्हणण्यास सुरुवात करतात. गाढव मोठमोठ्याने ओरडू लागतो. कुत्रा पण जोरजोरांत भुंकण्यास सुरुवात करतो. मांजर आपल्या नाजूक स्वरांनी म्याव म्याव करते. कोंबडा आरवण्याचा आवाज काढतो. हे सर्व आवाज ऐकून ती चार माणसे घाबरून घराबाहेर पळू लागतात. ते एका झाडामागे जाऊन बसतात. ती माणसे चोर असतात. त्यांनी ब्रेबीन शहरातून दागिने, पैसे चोरून आणलेले असतात. ते सर्व त्याच घरात असतात. ते चोर लोक विचार करतात. अरे, आपण चोरून आणलेल्या सर्व वस्तू घरातच राहिल्या. आपण दोघे परत जाऊन त्या वस्तू घेऊन येऊ. असे म्हणून ते दोघेजण वस्तू आणण्यास जातात. नुकतेच त्या प्राण्यांचे जेवण झाले असल्यामुळे आणि चालून चालून दमल्यामुळे ते प्राणी त्या घरात विसावा घेतात. पण मांजरीला झोप काही केल्या येत नव्हती. एका कोपर्यात मांजर बसूनच राहिली. अंधार असल्यामुळे मांजरीचे फक्त डोळेच दिसत असतात आणि ते चमकत असतात.
हे पाहून दोघे जण म्हणतात, अरे! इथे काहीतरी भयानक दिसत आहे. असे म्हणून ते दोघे जोरजोरात ओरडू लागतात. हे ओरडणे ऐकून सर्व जण जागे होतात. कुत्रा त्या माणसांच्या पायाला जोरात चावा घेतो. गाढव त्यांना लाथा मारण्यास सुरुवात करते, मांजर जोरजोरात 'म्याव म्याव' करण्यास सुरुवात करते, कोंबडा सुद्धा ओरडू लागतो. ती दोन माणसे कशीबशी त्या सर्वांच्या तावडीतून आपली सुटका करून घेतात व काहीही न घेता रिकाम्या हातांनी तेथून पळ काढतात.
दुसर्या दिवशी ही बातमी वार्यासारखी ब्रेबीन शहरात पसरते. मग काय, त्या शहरातील लोक त्या जंगलात येतात व त्या प्राण्यांची पाठ थोपटतात. ज्यांचे दागिने, पैसे चोरीस गेलेले असतात ते ओळखून आपापले घेतात. मग ब्रेबीन शहरातील लोक त्या सर्व प्राण्यांना घेऊन शहरात येतात. त्यांची मिरवणूक काढतात. त्या प्राण्यांची राहण्याची, खाण्याची व्यवस्था हे सर्व लोकच करतात. अशा तर्हेने हे दु:खी कष्टी असलेले प्राणी आपले म्हातारपण गुण्या गोविंदाने घालवितं राहतात.
तात्पर्य : आलेल्या संकटाला घाबरून न जाता त्यातून योग्य तो मार्ग काढण्यास शिकले पाहिजे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा