आणखी एक सांगू... तू छान दिसतोस. माझी मैत्रिण निशा म्हटते तू आपल्या कॉलेजच्या 'शाहिद कपूर' आहेस म्हणून. आणि तिनं तसं म्हटल्यापासून खरचं मला तुझ्यात आणि त्याच्यात काही गोष्टी सेम भासायला लागल्या आहेत... आई शप्पथऽऽऽऽ निशा आणि मी दोघींनी कॉलेजचा पिरियड बंक करून पर्वा 'जब वुई मेट' पाहिला. ग्रेट आहे ना पिक्चर! शाहिद तर किती गोड दिसलाय आणि त्यात तू मला मैत्रिण बनविल्यापासून खरं सांगायचं झालं तर मी थोडी हवेतच आहे. (निशाच असं म्हणाली) मी तूला एकदम पत्र लिहायला बसलेय... कदाचित हे जरा जास्तच होत नाही नां. निशाला मी हे सांगितलं नाही. ती म्हणजे जरा 'पीळ' आहे. ऊगाच काहीच्या काही सबंध जोडेल. पण, या वयात 'मित्र' मिळाला ही जरा मस्तच वाटतं. त्या दिवशी आईनं ते पिवळं फूल पाहून विचारलं 'पूजेऽऽऽ' हे कुठून आणलसं... तिला मित्रानं किंवा कॉलेजमधल्या मुलानं दिलं म्हणून सांगितल असतं तर प्रश्नांची सरबत्ती चालू झाली असती. 'कोण तो..', 'नाव काय..', 'मवाली नाही ना..','आई-वडील कुठं असतात' आणि शेवटी 'कोणत्या जातीचा..' वगैरे वगैरे... आई माझी जरा जास्तच काळजी घेते. तिला तसं म्हटलं तर म्हणते 'आई झालीस की कळेल..' असेलही...
पण, खरी एक गंमत सांगू. आईला 'अमित' नाव आवडतं. तिला अमिताभ बच्चन जाम आवडतो. त्याचे पिक्चर अगदी इनव्हॉल्व होऊन बघत असते. तिच्या कॉलेजच्या वेळी तो जाम फेमस असणार. त्यामुळं तुझं नाव तिला नक्की आवडेल...
परवा डॉली काय म्हणाली माहित आहे? ती मला म्हणाली... 'माझी मैत्री स्विकारशील' असं सांगून मुलं प्रेमाची सुरूवात करतात आणि मुली प्रेमाचा शेवट ' तू फक्त माझा चांगला मित्र आहेस' म्हणून करतात. डॉली असं विचित्र पण, मार्मिक बोलतं असते.
असो.. अच्छा तर मी आता रजा घेते. माझ्या पत्राचं उत्तर पत्रानच दिलसं तर मला आवडेल. आता हे पत्र तुला कसं पोहोचवायचं याचा विचार मी करत आहे. निशाल कळलं तर जाम पीळ देईल.
पूजा...
(क्रमश:)
लेखक साता-यातील साहित्यीक आहेत.