तो लहानपणापासून नेहमी माझ्या सोबत असायचा. शाळेत माझ्या अभ्यासातील कमतरता भरून काढण्यास तो नेहमी सहकार्य करायचा. त्या त्याच्या सहकार्यातून त्याने खूप काही सांगितले.
तुला आठवते, आपली पहिली भेट. बालवाडी शाळेच्या दारात मी भोंगा पसरून बसले होते. मला पोचवायला आलेल्या आईचा हात सोडायला तयार नव्हते. तुझी आई तुला नुकतीच सोडून गेली होती. कारण तू पण रडत होतास पण आवाज मोठा नव्हता. डोळ्यात आसवांचे थेंब जमा झाले होते. एखादा ओघळ गालावर आला होता. ‘तो बघ किती शहाणा मुलगा आहे. त्याची आई त्याला सोडून गेली तरी तो रडत नव्हता हो किनई रे? हिला सांभाळ हं.’ माझी आई तुला म्हणाली!
हो, अशी मान हलवून डोळ्यात पाणी पुसत तू शहाणा दिसण्याचा प्रयत्न केलास अन् माझा हात आपल्या हातात घेऊन बसलास. त्या दिवसापासून रोज शाळेच्या दारात माझी वाट पाहात उभा असायचा, शाळा- कॉलेजमध्ये गेल्यावर तासिका बुडवायचा. नंतर येत होता पण अभ्यासात हुशार होतास. मग काय तू मैदानावर अन् इकडे माझा जीव खाली वर व्हायचा. विचारचक्र सुरू व्हायचे! हजेरी भरेल का, प्रॅक्टिकल पूर्ण होतील का? या परीक्षेला बसता येईल का? आणि बसला तरी पास होईल का? तू कधीच हार पत्करली नाहीस. वर्षाच्या शेवटी अभ्यास करून सुद्धा इतके मार्क कसे मिळवतो याचे मला कोडं पडत असे अन् मी मात्र अभ्यास करून तुझ्या मागे. असे का?
एकीने मला विचारले, तो तुझा कोण लागतो गं? हा प्रश्न लहानपणापासून अनेकांनी विचारला होता. पण मला कधीच उत्तर सुचलं नाही. दुसर्याने कोणी बघितलं, खोडी काढली तर तुला ते आवडत नसे, तुझ्या बाबतीत सर्व गोष्टी तू मला अन् मी तुला सांगायची. कोण होतास तू माझा? खरं म्हणजे आपण कधी विचार केला नव्हता!
माझ्या आईला विचाल्यावर ती कौतुकाने म्हणायची, लहानपणी एकदा त्याला सांगितले, ‘हिला सांभाळ’. तू माझा कोण मित्र की, भाऊ का अन्य कोणी? अनेकवेळा या प्रश्नाला उत्तर देण्यास टाळाटाळ करायची. कॉलेजमधील मुलीला मात्र मी लगेच उत्तर दिले, ‘ती म्हणजे अशी व्यक्ती जी माझ्या आयुष्यातून वजा केले तर उत्तर शून्य येईल.’
तिला काय समजायचे ते समजले पण तेव्हापासून मला प्रश्न केला नाही. आता तू तर मोठा इंजिनिअर झालास. मी मात्र पदवीधर झाले. आपला अभ्यास वाढला पण भेटी मात्र कमी झाल्या नाहीत. जगण्यासाठी जसा श्वास घ्यावा लागतो तसे आपण एकमेकांना भेटत आहोत. काय आनंद असायचा एकमेकांना भेटण्याचा. आजही तुझी भेट झाली, सहकार्य आठवून अस्वस्थ होते.
शेवटी काय मैत्रीचं नातं. कायम स्मरणात राहिलेलं.
प्रदीपकुमार भोसले