प्रेम करायला, कुणाच्या मार्गदर्शनाची कोचिंग क्लासेसची गरज लागत नाही, अनाहूतपणे एकमेकांचे विचार, मने जुळली कि
झाले प्रेम... माझे ही तसेच झाले, माझ्या प्रमाणे अनेकांचे झाले ही असेल.
मी आणि ती एकाच कॉलेजमध्ये आणि एकाच वर्गात माझ्या गावापासून तिचे गाव पाच किलोमिटर पुढे असल्याने, रस्ताही एकच आणि येण्याजाण्यासाठी बसही एकच... हा एक निव्वळ योगायोग, सुरुवातीला तिच्या शेजारीही मी बसत नव्हतो, गाडीला गर्दी होत असल्याने मी ताटकळत उभा राहायचो. पंधरा दिवसानंतर तिला काय वाटले कुणास ठाऊक, तिने येतानाच, तिच्या शेजारी हातरुमाल टाकून जागा धरली, मात्र बसलो नाही, तिनेच बस ना, म्हटल्यावर अंग चोर बसलो... आणि त्या दिवसापासून सुरू झाला आमच प्रेमाचा काटेरी प्रवास.. एकाच बसमध्ये एकाच सिटवर बसून गप्पागोष्टीचे रुपांतर प्रेमात कधी झाले, हे कळालेसुद्धा नाही, गप्पा कितीही गर्दी असली तरी मी बेफिकीर असायचो, कारण माझी जागा धरणारी माझी ‘ती’ त्या गाडीत असायची. गप्पांच्या ओघात स्टँड कधि यायचे कळायचे ही नाही.