Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पायर्‍या प्रेमाच्या...

पायर्‍या प्रेमाच्या...
आयुष्यभर एकमेकांना साथ दिलेल्या दोन चिनी प्रेमवेड्यांची ही कथा आहे. रूढ नितीनियमांच्या पलीकडे जाऊन हे प्रेमी युगल परस्परांजवळ आले आणि एकमेकांना साथ दिली.

आजपासून पन्नास वर्षांपूर्वी लुई गओजियांग तेव्हा 19 वर्षाचा होता. प्रेमात पडण्याचंच हे वय. हा लुई तेव्हा प्रेमात पडला तो 29 वर्षाच्या विधवा शू चाओजिनच्या.तिला पाहिले आणि तो तिला हृदय देऊन बसला.

दोघांनी लग्न करायचे ठरविले. त्यासाठी पालकांना विचारणा केली. परंतु, होकार तर दूरच पण चहूबाजूंनी विरोधच झाला. शूचेही लुईवर निस्वार्थ प्रेम होते. त्या दोघांनी आपापल्या पालकांची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु, त्याचा काही एक उपयोग झाला नाही. शेवटी त्यांनी पळून जाऊन लग्न केले. रहाण्यासाठी त्यांनी चीनच्या दक्षिण भागातील एका गुहेत आसरा घेतला.

शूचे वय लुईपेक्षा दहा वर्षांनी जास्त होते. त्यामुळे रोज उंच डोंगर चढायला शूची दमछाक होत होती. याची जाणीव लुईला होती. त्यामुळे त्याने डोंगरावर आल्याच्या दुसर्‍या दिवसापासूनच डोंगराला पायर्‍या कोरायला सुरवात केली. तब्बल पन्नास वर्षे त्याने पायऱ्या खोदण्यात घालवली. आपल्या प्रिय पत्नीला डोंगर चढायला त्रास होऊ नये म्हणून तब्बल 6 हजार पायर्‍या त्याने स्वतः कोरल्या. आजही त्या डोंगरावर त्या पायऱ्या या प्रेमी युगलाची आठवण करून देतात.

एके दिवशी शेतातून घर आल्यानंतर लुई अचानक बेशुध्द पडला. त्याच्या जीवनाचे हे शेवटचे क्षण होते. त्याचा हात त्याची पत्नी शूच्या हातात होता. शू त्याला पाहून सारखी रडत होती. लुईने हसत हसत तिचा निरोप घेतला आणि अनंताच्या प्रवासाला तो निघून गेला. शूचे अश्रू थांबत नव्हते. त्याच्या विरहात तीही नंतर हे जग सोडून गेली.


त्यांच्या पायऱ्या मात्र त्या डोंगरात तशाच होत्या. 2001 मध्ये या पायर्‍यांकडे सामजिक कार्य करणार्‍या एका संस्थेचे लक्ष गेले. या पायर्‍या एका व्यक्तीने पन्नास वर्षे खपून हाताने कोरल्या आहेत यावर त्यांचा विश्वासच बसला नाही. नंतर वर्ष 2006 मध्ये 'चायनीज वुमन वीकली'ने त्यांच्या प्रेमकथेचा समावेश चीनमधील सर्वश्रेष्ठ 10 प्रेमकथामध्ये केला. चीनच्या सरकारने या 'प्रेमाच्या पायर्‍या'आजही जतन करून ठेवल्या आहेत. ज्या गुहेत हे प्रेमी युगल रहात होते, त्याचे म्यूझियममध्ये रूपांतर केले आहे. आजही अनेक प्रेमी युगल या स्मारकाला भेट देण्यासाठी येत असतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi