Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Love Tips : आंतरजातीय विवाह

Love Tips : आंतरजातीय विवाह
माझा आंतरजातीय विवाह होता. आपला समाज कितीही पुढारलेला असला तरी लग्नाचा जेव्हा विचार येतो तेव्हा जातीपातीचा विचार केला जातोच. पण तरीही जातीपातीचा विचार न करता आमच्या दोघांच्याही घरचे लग्नाला तयार झाले. झालं आम्हाला आकाश ठेंगणं झाल्यासारखं वाटत होतं. एकमेकांच्या घरच्यांना बोलावून लग्नाची बोलणी करण्यासाठी विचारणा होऊ लागली. तेव्हा मात्र नव-याकडची मंडळी टाळाटाळ करू लागली. मुलीचे आई-वडील म्हणून आई-वडिलांची माझ्याप्रति काळजी वाटणं अगदी रास्त होतं. ते मलाही कळत होतं. पण त्यांच्याकडून उशीर होत होता. शेवटी एक दिवस त्याच्या आईने फोन करून मुहूर्ताच्या चार ते पाच तारखा सांगितल्या. आणि त्यांच्याकडची मंडळी आमच्याकडे लग्न ठरवण्यासाठी आली. ही मंडळी आल्यावर नेमकी कोणती तारीख ठरवायची याबाबत चर्चा होईल, असं वाटलं होतं. मात्र घरी आल्यावर घडलं मात्र वेगळंच. मुळात ज्याच्यावर माझं प्रेम होतं तो आलाच नव्हता. आणि त्याच्या आईने फोन करून तारखा सांगितल्या आहेत, याची मात्र त्याची आई सोडली तर कोणालाच पुसटशी कल्पनादेखील नव्हती. त्यामुळे त्यांनी घरी आल्यावर तारखा सांगितल्याच नाहीत, असं स्पष्ट सांगितलं. ते ऐकल्यावर माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण हा धादांत खोटारडेपणा होता. या प्रकाराने आई-वडील चिडणं अगदी स्वाभाविक होतं. तसंच झालं. ठरणारं लग्न ठरण्याआधीच मोडलं गेलं. आता सगळं संपलं असं वाटायला लागलं. अर्थात, ‘त्या मुलाला विसरून जा’ , ‘आता हे लग्न होणं शक्य नाही’ , अशी वाक्य माझ्याही कानावर पडायला लागली. मीदेखील घाबरून गेले. 
 
पण मी दुस-या दिवशी झालेलं सगळं त्या मुलाला सांगितलं. त्याला झाल्या प्रसंगाची कल्पना आली, मुख्य म्हणजे त्याने माझ्यावर अजिबात अविश्वास दाखवला नाही. कारण मी कधीच खोटं बोलत नाही, हे त्याला चांगलं माहीत होतं. त्यामुळे त्यानेही मला साथच दिली. अर्थात त्यानंतर लग्न जमेपर्यंत किती नाकीनऊ आले हे काही सांगायलाच नको. कारण लग्न ठरवतानाच कोणी खोटं बोलत असेल तर पुढे किती गोष्टींमध्ये खोटं बोललं जाईल याची कल्पना न केलेलीच बरी. यातून एक गोष्ट मात्र निश्चित शिकले. कोणत्याही नात्याची सुरुवात खोट्याने होत असेल तर ते नातं कधीच टिकत नाही. म्हणूनच प्रत्येक नातं प्रामाणिक ठेवायला हवं. आजकाल कोणीच खरं बोलताना दिसत नाही. कोणाच्या मुखवट्यामागे काय दडलं आहे याचा थांगपत्ता समोरच्याला लागत नाही. बाहेरच्या जगात आपण कोणाकोणाची तोंडं गप्प करणार? प्रत्येकाने आपल्या घरात खरं बोलायला सुरुवात केली तरी कितीतरी गोष्टी साध्य होतील, असं वाटतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उन्हाळ्यात लग्न करताना वापरा असे दागिने…