कधी कैफियत, कधी कसोटी
कधी रंगली विनोदी मैफल
कधी मारल्या केवळ गप्पा
बांधुन आठवणींचा गठ्ठा
असा आमचा कॉलेजचा कट्टा...
प्रत्येकालाच आपल्या आयुष्यातील मोठा आधार म्हणजे कॉलेजचा कट्टा वाटत असतो. कट्टा म्हटलं की आपण आठवणींमध्ये रमून जातो. अनंत आठवणी जाग्या होतात.
पावसात घातलेला झिंमड धिंगाणा, लेक्चर्स बंक करुन केलेली धमाल, पैसे गोळा करुन गुपचूप पाहिलेला सिनेमा, गरमागरम वडापाव नि उकळलेल्या चहाच्या सोबतीनं घेतलेला आस्वाद... चर्चेच्या वादावादीनंतर सार्यांनीच केलेला करार.. आणि या सार्यांचा विचार करतात करता आठवते, की किती दिवस झाले आपण कट्ट्याकडे फिरकलोच नाहीत.
कट्टा म्हणजे एकत्र भेटण्याची खास जागा. कट्टा म्हणजे प्रत्येकाचा जीव की प्राण. तसं पाहिला गेलं तर कट्टा म्हणजे रिकामटेकड्यांचा अड्डा, फालतू टाइमपास करण्याचे ठिकाण असं आयुष्यात कधीही कट्ट्यावर न गेलेल्यांकचे टोमणे कट्ट्यावर नियमित जाणार्यांना ऐकायला मिळतात.
खरंतर कॉलेज कट्टा म्हणजे वेगळीच मजा असते. कॉलेज भरलं किंवा ते सुटलं तरी कट्टा हा सदैव फुललेलाच असतो. मला आठवतो एस पी कॉलेजचा लेडी रमाबाई हॉलच्या जवळचा कट्टा! गेले दोन वर्ष झाले तो कट्टा आणि कट्ट्यावरच्या कडू-गोड आठवणी ‘मिस’ करतेय. खरंच प्रत्येकाच्या वाट्याला एकदा तरी कॉलेज कट्टा यायलाच हवा.
कॉलेजचा कँम्पस म्हणजेच आम्हा सर्व मित्र-मैत्रिणींचा कट्टा. अमृता, प्राची, सोनम, िखी, अमित, पंकज आणि मी असे आम्ही सप्तरंग इथे पडिक असायचो. हा कट्टा म्हणजे आमचं दुसरं घर होतं.
दिवसभरातील थकवा, ताण-तणाव विसरुन आत्ताचा क्षण जगणं म्हणजे काय असतं याचा बोध आम्हा सार्यांना या कट्ट्यानेच करुन दिलेला. अमेरिकी मंदीपासून ते कॉलनीतील भांडणापर्यंत अशा अनेक विषयांवर येथे चर्चा चालायची. कट्ट्यावरचा सर्वांचाच चर्चेचा विषय म्हणजे सुंदर मुली. अर्थात सरप्रायझिंगली येणारा हा विषय असतोच. कधी-कधी करियर, फ्युचर, स्कोप, प्लॅन, पोर्ट-फोलियो असे जड शब्दही या कट्ट्यांवरील गप्पांमधून कानावर पडत.
कधी गप्पांची गाडी शिक्षणावरुन थेट राजकारणाचा स्टॉप घेत देश, इतर देश, दहशतवाद, फिक्सींग असे विषय ओलांडत फॅशन, सिनेमा, गॉसिप्सची स्टेशन गाठत ही गाडी कितीतरी वेळ चालत असायची.
कट्ट्यावरचा आणखी एक आगळा-वेगळा विषय म्हणजे कट्ट्यावरची भाषा. हिंग्लीश अर्थात हिंदी व इंग्रजीचं मिश्रण करत मराठीत बोलण्याचा सराव येथे चांगला होत.
या कट्ट्याचे दिवस इतके आनंदात जायचे की, मी, अम्या, अमृता दुसर्याला चिडवण्यात तरबेज, इतरांच्या दृष्टीने आसुरी! खूप मजा यायची, मात्र दुसर्टांनी चिडवलं की आमची झणझणीत तिखट उत्तरं तयार असायची, मग रंगायची खर्या अर्थाने जुगलबंदी.
कट्ट्यावर आलं की मग थोडेसे टेन्शनही हास्याच्या मोरपिशी स्पर्शने हलके व्हायचे तेव्हा आमच्या प्रत्येकाच्या चेहर्यावर असायचे आश्चर्य, कुतूहल आणि कौतुक.