प्रेमाबद्दल आणखी काय लिहावे? दाताच्या कण्या केल्या, कवळी लागली, बधीर बहिरे झाले कित्येक, तरी प्रेम विषय संपत नाही. मानेला पट्टा लागला, तरी सुंदर तरुणीकडे वळून पाहावेसे वाटते. नाकावर चष्मा बसला, तरी वरून पाहावेसे वाटते, असे हे प्रेम कधी कोणाबद्दल वाटेल ते सांगता येत नाही.
प्रेमाबद्दल काय बोलावे? बोलावे तेवढे थोडेच! कालिदासापासून कुसुमाग्रजांपर्यंत, गालिबपासून थेट सुरेश भटापर्यंत सर्व काही गजलकारांनी प्रेमाच्या आळवण्या केल्या. प्रेम तरुणच राहिले. प्रेमात त्यावेळी पडलेले आता म्हातारे झाले. तरी प्रेमाला मनोमन कुरवाळताहेत.
पती-पत्नी, प्रियकर प्रेयसी तसेच मित्र मैत्रिण यांच्यामधील प्रेम वेगळे असते. पती-पत्नीचे प्रेम मुरलेल्या गुळांब्यासारखे आंबटगोड असते. प्रियकर प्रेयसीचे प्रेम चोरून कैरी पाडण्यासारखे असते. मित्र मैत्रिणीमधले प्रेम आंब्याच्या पेटीसारखे असते. प्रेमाच्या अशा तीन प्रमुख तर्हा. प्रेमात येणारे शब्दही रोचक पाचक असतात. जसे आवडणे, खेचले जाणे, तुझ्यात मी, माझ्यात तू, भाळणे, हवेसे वाटणे, लव्हेरिया, टाईमपास, व्याकूळ, फक्त तुझाच वगैरे. प्रेमात पडल्यावर जग विसरालया होतं. प्रेयसीने तंबी दिली की, क्षणात सिगारेट ओढणं बंद होतं. रात्रीचा दिवस होतो किंवा दिवसा चांदणे दिसू लागते. एकटचं हसायल होतं. किती चाललो तेच कळत नाही.
प्रेम हा रोग आहे आणि औषधही आहे. प्रेम ही भावना जीवनामध्ये खूप महत्वाची आहे. जेव्हा कुणावर प्रेम करू लागता. तेव्हा पंख फुटतात. क्षणार्धात मनानं तिच्या किंवा त्याच्याजवळ पोहोचता! तिची येण्याची वेळ, तिची आवड, तिच्या मैत्रिणी, तिचा भाऊ सर्वांबाबत तुम्हाला आपुलकी वाटत असते. प्रेम म्हणजे कसे तरी करून जमणारे नसते. ते फार काळजीपूर्वक करावे लागते. 'नेमाने तूज नमितो, गातो तुझ्या गुणांचा कथा' इतके ते एकनिष्ठपणे जमावे लागते. प्रेम म्हणजे पूजा, प्रार्थना, अर्चना होय. नुसता तीर्थ-प्रसाद घेऊन बाजूला होणे म्हणजे प्रेम नव्हे, तर आरतीलाही वेळेवर हजर राहावे लागते. प्रेम करणं ही कला आहे. प्रेमात पडणं हा अनुभव आहे. बहुधा प्रत्येक जण तो घेतो, पण फार कमी लोकांना प्रेम साधतं. प्रेमात पडून जखमी झालेल्यांची संख्याही मोठी आहे.