Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माझे मन तुझे झाले....

- नितिन फलटणकर

माझे मन तुझे झाले....
ND
श्रावणातली पहाट.. गारवा अंगाला झोंबतोय, चहाच्या कपावरची वाफ त्या गारव्याशी सलगी करण्‍याचा प्रयत्न करतेय, पावसाच्या सरी मधेच थेंब-थेंबात घसरत तुझी आठवण करुन देत आहेत. आणि या अशा मोहक वातावरणात तु माझ्यापासून कोसो दूर आहेस.

तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण मला आपल्या भेटीची आठवण करुन देतो. तुझ्या डोळ्यांची भाषा मला कधीच उमगली नव्हती आणि यामुढेही मला त्यांचे शब्द कळणार नाहीत, पण तुझ्या मनाचा माझ्या मनाशी सुरु असलेला संवाद आजही सुरु असतोच.

माझे मन एकटेच तिकडे दूर-दूर डोकावत असते. त्याला नेमके कोण हवे असते, ते सांगायची त्याची तयारी नसते, पण त्याचा शोध मात्र अविरतपणे सुरु असतो.

मी त्याला अनेकदा रोखण्‍याचा प्रयत्न केला, परंतु माझी बंधनं झुगारत ते तुला शोधत फिरत असते. तुझी चाहुल जरी लागली तरी ते मला तिकडे तुझ्याकडे खेचते.

त्याला वेळेचे भान नाही, त्याला पावसाची जाण नाही, त्याला गारवाही बोचत नाही, आणि निनावी चालणार्‍या माझ्या मनाला रस्त्यांवरचे खडेही टोचत नाहीत. त्याला फक्त आस असते, ती तुझ्या मनाची.

पावसाचे थेंब दोनही हातांच्या ओंजळीत पकडत माझे मन तुला शोधत असते. हातात जमलेले पाणी त्याला तुझ्या पाणीदार डोळ्यातील थेंब वाटतात. पाऊस संपल्यावर माझे मन मग त्याच पाण्यात रंग मिसळत उगाच कॅनव्हॉसवर तुझा चेहरा रेखाटण्‍याचा प्रयत्न करते.

रंगांनाही आता त्या पाण्याची सवय झालीय, दुसरं पाणी टाकलं की चित्र बिघडतं. पांढर्‍या कॅनव्हॉसवर पाण्याचा रंगही मग काळा वाटू लागतो.

जरी तू दूर असलीस तरी ‘माझे मन आता तुझे झाले आहे’ माझा प्राण, तुझा प्राण या ओळी आठवतात आणि कितीतरी वेळ मन तेच गाणे गुणगुणते.

माझे मन तुझे झाले. तुझे मन माझे झाले.
माझा प्राण, तुझा प्राण
नाही आता वेगळाले....

Share this Story:

Follow Webdunia marathi