उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजुनही, अजुनही
सोनेरी हे दुत आले
घरटयाच्या दारापाशी
डोळयांवर झोप कशी
अजुनही, अजनुही?
लगबग पांखरे ही
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहींकडे, चोहींकडे,
झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचे मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या, चिमुकल्या?
बाळाचे मी घेतां नांव
जागी झाली चिऊताई
उडोनीया दुर जाई
भूर भूर, भूर भूर
_कुसुमाग्रज