Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गदिमा- पिढयापिढयांच्या निर्भय आम्ही, भारतीय भगिनी

गदिमा- पिढयापिढयांच्या निर्भय आम्ही, भारतीय भगिनी
, बुधवार, 29 जून 2022 (17:17 IST)
पिढयापिढयांच्या निर्भय आम्ही, भारतीय भगिनी
 
घराघरांचे दुर्ग झुंजवू, झुंजू समरांगणी ॥धृ०॥
 
अष्‍टभुजेच्या वंशज आम्ही, महिषासुर मारु
 
देवत्वाच्या गुढया उभारु, दानव संहारु
 
वलय होउनी वज्र नांदते, आमुच्या कर कंकणी ॥१॥
 
रणधीरांच्या सन्निध आम्ही स्फूर्तीसह राहू
 
रथचक्राच्या आसाठायी घालू निजबाहू
 
घडवू रामायणे, शत्रुचा मद उतरु रावणी ॥२॥
 
शस्‍त्रहि दिसते शोभुन आमुच्या शोभिवंत हाती
 
भौम मातता चारु त्याला सैन्यासह माती
 
स्त्रीहट्टाच्या बळे बहरवू स्वर्गसुखे अंगणी ॥३॥
 
रणयागांतरी सर्वस्वाच्या आहूती टाकू
 
अभिमन्यूंच्या बसू रथावर, अश्‍वाते हाकू
 
सती उत्‍तरेपरी आवरु डोळ्यांतच पाणी ॥४॥
 
जिजा, अहिल्या, झाशीवाली आमचीच रुपे
 
सुताऽवतारे जितली युद्‌धे अमुच्या संतापे
 
आ-शशितरणी स्वतंत्र राखू भारतीय धरणी ॥५॥
 
 
ग.दि. माडगूळकर

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पावसाळ्यात कानाच्या संसर्गाचा धोका वाढतो, तर अशाप्रकारे घ्या काळजी