माहेरी आलेल्या लेकीच्या आईचे मनोगत......
लेक आली माहेराला
सुनबाई नीट वागा...
दोन दिसांची पाहुणी
राग राग करु नगा
आली थकून भागून
नको सांगू काही काम...
माहेराच्या सावलीत
तिला करु दे आराम
फार मनाची हळवी
बोलू नको शब्द उणा...
राख तिचा मान-पान
दिसू दे तुझा मोठेपणा
लेक आली माहेराला
कर काही गोडं-धोडं...
जिरे-साळीच्या भाताला
तूप वाढ लोणकढं
कर खमंग काहिसं
दुपारच्या फराळाला...
फार आवड फुलांची
धाड निरोप माळ्याला
आणि लिंबाच्या झाडाला
देई झोपाळा टांगून...
तिचे बालपण तिला
भेटल हिंदोळे घेऊन
लेक चालली सासरी
जीव होइ माझा हूरहूर...
मुरडीचा कानवला
गव्हल्याची कर खीर
ओटी भर, हाती देई
खण जरीच्या काठाचा...
दही घाल हातावर
टांगा थांबला केव्हाचा
थकला गं माझा जीव
हात-पाय उचलेना...
तूच आता तिची "आई"
जप माझी भोळी मैना