रखरखीत उन्हात वाळत घातल्यासारखं
आयुष्य खडखडीत कोरडं झालं.
दमट, कुबट गंध वरच्यावरच उडून
सर्वार्थानं स्वच्छ झालं.
प्रखर सूर्याच्या निखार्यागत उन्हानं
तावून सुलाखून निघावं
तसं सोनाराच्या भट्टीतल्या
बावनकशी सोन्यासारखं
पिवळधम्म चमकू लागलं.
भडकत्या ज्वाळेच्या
एकाच रपट्यात
सारी जाळी जळमटं जळून खाम व्हावी
त्याप्रमाणे सांदी-कोपर्यात लपून बसलेले
राग-विराग, आशा-अभिलाषा
एकाच झटक्यात परांगदा झाले
सगळी ओझी
अशी गळून पडली, एकामागोमाग
मग मीच माझं बोट धरून हळूवार
उगवतीला अभिमुख होऊन
चालू लागले
आपोआप.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा