Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ग्रंथ तुमच्या दारी, कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांचा पहिला आंतरराष्ट्रीय वाचक मेळावा

ग्रंथ तुमच्या दारी, कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांचा पहिला आंतरराष्ट्रीय वाचक मेळावा
शारजा (UAE) , बुधवार, 21 सप्टेंबर 2016 (10:46 IST)
ग्रंथ तुमच्या दारी, दुबई आणि आमी परिवार (Akhil Amirati Marathi Indians) यांच्या संयुक्त विद्यमाने शारजा युनिव्हर्सिटी सभागृहात पहिल्या आंतरराष्ट्रीय वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक श्री प्रवीण दवणे यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक व ग्रंथ तुमच्या दारीचे प्रवर्तक विनायक रानडे, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी विश्वस्त व उद्योजक श्री विश्वास ठाकुर,  दुबईत ग्रंथ तुमच्या दारीला सुरुवात करून देणारे व प्रसिद्ध उद्योजक डाॅक्टर संदिप कडवे, आमी परिवाराचे संस्थापक संतोष कारंडे, आमीचे मुख्य कार्यकारी आधिकारी नितीन साडेकर, प्रसिद्ध अनुवादक आणि लेखक श्री रवींद्र गुर्जर उपस्थित होते.
 
कार्यक्रमाची सुरुवात वालिशा किरपेकर ,सानवी सावंत ,स्वरदा पाटील ,अवनीं रिसबुड या चिमुकल्या मुलींनी गायलेल्या सरस्वती वंदनाने झाली. युएईच्या विविध भागातून आलेले जवळपास ४००—५०० वाचक प्रेमी मराठी बांधव या मेळाव्यास उपस्थित होते. यावेळी डाॅक्टर संदिप कडवे यांनी संपादित केलेल्या 'विश्व पांथस्थ' या पहिल्या आखाती मराठी मासिकचे प्रकाशन करण्यात आले. तसेच प्रवीण दवणे यांच्या 'एक कोरी सांज' या नव्या काव्यसंग्रहाचेही प्रकाशन करण्यात आले.
 
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात आमी परिवाराचे कार्य व उद्देश यावर श्री संतोष कारंडे आणि श्री नितीन साडेकर यांनी माहिती दिली. सोशल नेटवर्किंगचा सदुपयोग करून श्री कारंडे यांनी गेल्या पाच महिन्यात युएईतील जवळपास अडीच हजार मराठी माणसांचे संघटन केले आहे. त्याचा पुढील उद्देश हा युएईतील सर्व दीड लाख मराठी बांधवा पर्यंत पोहचण्याचा असून आमीच्या माध्यमातून चालवलेल्या सामाजिक उपक्रमाची त्याच बरोबर नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या उद्योग जत्रेची माहिती त्यांनी यावेळी दिली. डाॅक्टर संदिप कडवे यांनी विश्व पांथस्थ मासिक बाबत माहिती देऊन सर्व वाचकांना आपले अनुभव, लेख आणि कविता या मासिकात छापण्यासाठी पाठवण्याचे आवाहन केले.
 
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते श्री प्रवीण दवणे यांनी सादर केलेली दोन विषयांवरील व्याख्याने. पहिल्या सत्राच्या उत्तरार्धात 'माझ्या लेखनाची आनंदयात्रा' आणि दुसऱ्या सत्रातील 'सावर रे' सादर करून रसिक प्रेक्षकांना मोहित केले. माझ्या लेखनाची आनंदयात्रा मध्ये श्री दवणे यांनी आपल्या जीवनातील साहित्यिक प्रवासाचे अत्यंत सुंदर वर्णन केले. आपले बालपणीचे विविध अनुभव सांगून त्यांनी श्रोत्यांना कधी हसवले तर कधी भावनिक बनवले. आजच्या आधुनिक काळात तरूण पिढी मोबाईल सारख्या उपकरणांच्या आहारी जावून वाचन संस्कृती विसरत चालली आहे. पैश्याच्या मागे न धावता खऱ्या बौद्धिक श्रीमंतीच्या मागे लागा, मातृभाषेवर प्रेम करा आणि वर्तमानात जगा असा संदेश त्यांनी दिला. दवणे सरांनी आपल्या आयुष्यात पु ल देशपांडे, कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, लता मंगेशकर, आशा भोसले यांच्या सहवासात अनुभवलेल्या अनेक आठवणी ताज्या केल्या. सावर रे या शेवटच्या सत्रात दवणे सरांनी विविध विषयांवर चर्चा करून आपल्या ओजस्वी वाणीने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध कले.
 
ग्रंथ तुमच्या दारी तर्फे युएई वाचकांसाठी नवीन चार ग्रंथ पेट्या श्रीकांत पैठणकर आणि राकेश पंडित यांच्या हस्ते श्री गणेश पोटफोडे (देअरा, दुबई), समिश्का जावळे (इंटरनॅशनल सिटी, दुबई) आणि वीरभद्र कारेगावकर  यांना प्रदान करण्यात आल्या.
 
webdunia
डॉ सुप्रिया सुधाळकर यांनी ६— १२ वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांकडून उत्कृष्ट नाट्य वाचन करवून घेतले. आखाती देशात जन्मलेल्या/ वाढलेल्या मुलांचे मराठी वाचन ऐकून श्री प्रवीण दवणे यांनी त्यांचे जाहीर कौतुक केले. पार्थ जोशी, आहान सुधाळकर, शुभ्रा सप्रे, वेदांत खाचणे, साकेत पलांडे , संकेत दिक्षीत, मिहिका भोळे , अवनी गोडबोले, हिमानीश चोथे या मुलांनी आपल्या वाचनाने उपस्थितांची मने जिंकली.
 
यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. ग्रंथ तुमच्या दारी  तर्फे घेण्यात आलेल्या 'ग्रंथ पेटीने मला काय दिले' आणि 'मला भावलेले पुस्तक' या विषयावरील निबंध स्पर्धेतील विजेते दिव्या करमरकर, गुरूदेव माने, रश्मी निसाळ, योगिता रिसबूड आणि गणेश पोटफोडे यांना प्रवीण दवणे यांच्या स्वाक्षरीतील ग्रंथ देऊन गौरविण्यात आले. तर आमी परिवारातर्फे आयोजित गणपती सजावट स्पर्धेतील विजेते सागर कोकणे, बाल चित्रकला स्पर्धेतील विजेत्या स्वरदा पाटील, झोया करंदीकर आणि अवनी रिसबूड यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री व प्रसिद्ध निवेदिका अनुजा पडसलगीकर यांनी उत्तम प्रकारे करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.
वाचकांना सहजपणे प्रश्नोत्तरांमधे गुंगवून प्रचिती तलाठी यांनी त्यांना  सहभागी करुन घेतले.
 
या मेळाव्याला ग्रंथ तुमच्या दारीचे समन्वयक निखिल व नेमिका जोशी, विशाखा पंडित,श्रीकांत व अपर्णा पैठणकर, धनश्री वाघ-पाटील, सुप्रिया सुधाळकर, किशोर मुंढे, तसेच आमी परिवार समितीचे  रघुनाथ सगळे, श्री स्नेहल कुलथे व श्री राजेंद्र वाघ यांच्यासह सर्वस्वयंसेवकांनी कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
 
पूर्ण कार्यक्रमाचे नियोजन हे सौ नेहा साडेकर व सौ रेवती कारंडे यांचा रॉक्स इव्हेंट कंपनी ने केले होते 
 
ग्रंथ तुमच्या दारी समन्वयकांच्या वतीने धनश्री वाघ-पाटील आणि किशोर मुंढे यांनी मनोगत व्यक्त केले.
 
मेळाव्याच्या प्रमुख संयोजिका विशाखा पंडित यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता अभिलाषा देसाई या चिमूकलीने गायलेल्या पसायदानाने झाली.
 
ग्रंथ तुमच्या दारीचे समन्वयक : श्वेता करंदीकर, श्रिया जोशी, सुजाता भिंगे, नेमिका जोशी, समिश्का जावळे, विशाखा पंडित, अपर्णा पैठणकर, धनश्री पाटील, नंदा शारंजपाणी, सुप्रिया सुधाळकर, जयश्री बागडे, नीलम दांडेकर, नीलिमा वाडेकर, किशोर मुंढे ,आमीचे स्वयंसेवक टीमचे रघुनाथ सगळे, संदिप पंडीत तसेच ग्रंथ तुमच्या दारीचे नाशिक येथील कार्यकर्ता अभिजीत साबळे आदि उपस्थित होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भांडी चकचकीत करण्यासाठी 5 सोपे उपाय