Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विश्वास पाटील

इतिहास जिवंत करणारा लेखक

विश्वास पाटील

मनोज पोलादे

मराठी कादंबरी क्षेत्रात सध्याचे तळपते व 'बेस्टसेलर' नाव म्हणजे विश्वास पाटील. ऐतिहासिक कादंबरी लेखन हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळेच पानिपत, संभाजी, महानायक या त्यांच्या कादंबर्‍यांनी विक्रीचे नवनवे विक्रम केले आहेत.

संभाजीसाठी तर सर्वाधिक मानधन घेणारा लेखक असा नावलौकिकही कमावला. त्यांची नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरील 'महानायक' कादंबरी खूपच नावाजली गेली. ऐतिहासिक कादंबरीचे लेखन करतांना पाटलांनी ऐतिहासिक तथ्ये व कादंबरी लेखनातील नाट्यमयता यांच्याशी समझोता न करता उत्कृष्ट साहित्य निर्मिती केली आहे.

पानिपत या कादंबरीच्या माध्यमातून आतापर्यंत उपेक्षित राहिलेल्या व कायम टीकेच्या केंद्रस्थानी असलेल्या सदाशिवराव भाऊ पेशवे यांच्यावरील अन्याय ऐतिहासिक सत्याद्वारे दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराजांची प्रतिमा आजपर्यंत वेगळी होती.

मात्र, त्यांच्यावरचा अन्याय दूर करून खरे संभाजी कसे होते हे पुराव्यानिशी त्यांनी त्यांच्या संभाजी या नव्या कादंबरीत मांडले आहे. लढाईतले, बाहेरचे डावपेच, शह काटशहाचे खेळ, युद्धस्थळीची वर्णने, प्रवासातील भौगोलिक सहल, चेहर्‍यांमागची माणसे शोधण्याचा प्रयत्न, हरण्या-जिंकण्याची कारणे हे सारे ते इतक्या जिवंतपणे उभे करतात की वाचक त्यात गुंतून जातो.

सनावळ्यांचा बेसुमार आणि उबग आणणारा मारा करणारा आणि स्वप्नरंजन करणारा, सत्याला बाजूला सारून स्वतःच रचलेला इतिहास ते कधीच सांगत नाहीत. इतिहासाशी पूर्ण प्रामाणिक राहून व त्याचे नवे पैलू शोधून मांडणारा लेखक अशी त्यांची प्रतिमा आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कादंबरीसाठी तर त्यांनी पार ब्रम्हदेशमार्गे जपानपर्यंत प्रवास केला. कारण काय तर याच मार्गाने सुभाषबाबूंनी प्रवास केला होता. त्यामुळे त्यांच्या कादंबरीत एक जिवंतपणा जाणवतो. सुभाषबाबूंच्या चरित्राचा एवढा व्यापकपणे शोध घेणारी कादंबरी खुद्द बंगालीतही नाही.

त्यामुळे या कादंबरीचा अनुवाद बंगालीसह अनेक भाषांत झाला. तेथेही ती बेस्टसेलर ठरली. वर्षातील सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणूनही ती गौरवली गेली. एेतिहासिक लेखक ही त्यांची ओळख हा खरे तर त्यांच्यावर अन्याय आहे.

कारण त्यांची झाडाझडती ही कादंबरी धरणग्रस्तांच्या प्रश्नावर आहे. शिवाय पांगिरा नावाची एक कादंबरी आहे. झाडाझडतीला साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पानिपत या कादंबरीवर आधारीत रणांगण हे नाटकही त्यांनी लिहिले.

तेही खूप गाजले. विश्वास पाटील हे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी आहेत. रायगड जिल्हा परिषदेचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. प्रशासनिक अधिकार्‍याची महत्वपूर्ण व ताण तणावांनीयुक्त जबाबदारी सांभाळत पाटलांनी साहत्यिक कारकिर्द घडविली आहे.


विश्वास पाटील यांनी केलेले लेखन ः

पानिपत, झाडाझडती, महानायक, संभाजी, चंद्रमुखी, रणांगण

Share this Story:

Follow Webdunia marathi