Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रणजीत देसाई

इतिहासाला शब्द देणारा लेखक

रणजीत देसाई

अभिनय कुलकर्णी

मराठीत ऐतिहासिक कादंबरी लेखनाची मोठी परंपरा आहे. रणजीत देसाई हे या नामावलीतील फार वरचे नाव. छत्रपती शिवाजी महाराजांवरील त्यांची 'श्रीमान योगी' ही मराठीतील एक श्रेष्ठ कादंबरी गणली जाते.

शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व लेखनातून पेलणे ही बाब सोपी नाही. हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी समोरच्या शत्रूशी सुरू असलेली लढाई आणि त्याचवेळी घरच्या आघाडीवर सुरू असलेले समर प्रसंग यातून महाराजांनी कार्य सिद्धीस नेले.

महाराजांच्या या पराक्रमाविषयीची नोंद पुस्तकात आहेच, पण एक पिता म्हणूनही त्यांची वेगळी मांडणी आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचायला हातात घेतले की खाली ठेववत नाही. ' स्वामी' ही देसाईंची आणखी एक लोकप्रिय कादंबरी.

माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील ही कादंबरीही वाचनीय आहे. इतिहास सांगताना त्याची अतिशय रंजक मांडणी देसाईंनी या पुस्तकात केली आहे. श्रीमान योगी व स्वामी या दोन्ही पुस्तकांची भारतीय साहित्य अकादमीने हिंदीत भाषांतरे केली आहेत.

याशिवाय देसाईंची 'पावनखिंड' ही आणखी एक ऐतिहासिक कादंबरी. त्यांची 'राधेय' ही कर्णावरची कादंबरीही लोकप्रिय आहे. राजा रविवर्मा या श्रेष्ठ भारतीय चित्रकारावरील चरित्रात्मक कादंबरी आवर्जून वाचण्यासारखी आहे.

देसाईंनी फक्त ऐतिहासिक साहित्य लिहिले असे नाही. ग्रामीण साहित्यातही त्यांचे मोठे योगदान आहे. सवाल माझा ऐका, रंगल्या रात्री या गाजलेल्या चित्रपटांच्या कथाही त्यांनीच लिहिल्या. त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

१९७३ मध्ये पद्मश्री देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या स्वामी कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. १९९० मध्ये त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.


रणजीत देसाई यांनी केलेले लेखन :

कादंबरी ः बारी, माझे गाव, स्वामी, श्रीमान योगी, राधेय, लक्ष्यवेध, समिधा, पावन खिंड, राजा रविवर्मा, अ‍भोगी, प्रतीक्षा, शेकरा


कथा संग्रह ः रूप महाल, मधुमती, जल कालवा, गंधाली, अलख, मोरपंखी सावल्या, कातळ, बाबुलमोरा, संकेत, प्रपात, मेघा, वैशाखी, आषाढ
,
नाटक ः कांचनमृग, धन अपुरे, पंख झाले वैरी, स्वरसम्राट तानसेन, गरूडझेप, रामशास्त्री, श्रीमानयोगी, स्वामी, पांगुळवाडा, लोकनायक, हे बंध रेशमाचे, तुझी वाट वेगळी, सावली उन्हाची.

चित्रपट ः रंगल्या रात्री, सवाल माझा ऐका, नागिन,

Share this Story:

Follow Webdunia marathi