Article Marathi Poets %e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%be %e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%95%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%80 108042900021_1.htm

rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एका बारबालेची कहाणी

एका बारबालेची कहाणी
NDND
मुंबईत डान्स बारवर बंदी घातल्यानंतर 'बार बाला' एकदम चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर या बारबालांचे पुनर्वसन कसे करणार याविषयीची चर्चा सुद्धा सुरू झाली होती. पण त्यानंतर सर्व काही थांबले. आता तर त्यांच्याविषयी काहीही ऐकू येईनासे झाले. पण गेल्याच आठवड्यात वैशाली हळदणकर या बारबालेच्या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले आणि बारबाला पुन्हा एकदा चर्चेत आल्या. या पुस्तकाचे प्रकाशन प्रख्यात दिग्दर्शक महेश भट यांच्या हस्ते झाले.

'बार बाला' असेच या पुस्तकाचे नाव असून वैशाली बारबाला का झाली, त्यासाठी कोणती परिस्थिती कारणीभूत ठरली? बारबाला झाल्यानंतरचे तिचे आयुष्य कसे होते आणि या आयुष्याने नेमके कोणते प्रश्न निर्माण केले या सर्व प्रश्नांवर हे पुस्तक भाष्य करते. प्रथमच कुणी बारबालेने पुढे येऊन आपल्या आयुष्याची 'चित्तरकथा' लोकांसमोर आणली आहे. वैशालीच्या या धाडसी प्रयत्नांना मेहता प्रकाशनाने शब्दरूप दिले आहे. विशेष म्हणजे औपचारिक प्रकाशानापूर्वीच या पुस्तकाच्या अडीचशे प्रती विकल्या गेल्या होत्या.

बारबाला बनलेल्या वैशालीच्या आयुष्याची कथा तरी काय आहे? वैशालीच जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. तिचे आई-वडिल संगीत विशारद होते. पण वडिलांची नोकरी सुटली आणि त्यांना संगीताच्या शिकवण्या घ्याव्या लागल्या. लहानपणीच वैशालीचे त्यांच्याच एका शेजार्‍याकडून लैंगिक शोषण झाले. तिच्या कुटुंबाची स्थिती चांगली नव्हती. त्यामुळे वैशालीला खायला-प्यायला घालायच्या बहाण्याने तो तिला बोलावून घेई आणि तिचे लैंगिक शोषण करी. एकीकडे हे होत असताना वैशालीला वडिलांचेही प्रेम मिळाले नाही. कारण त्यांना 'वंशाला दिवा' हवा होता. मुलगी नको होती. अशा या अडचणीच्या काळातच पैशाच्या तंगीमुळे वैशालीने आठवीतच शाळा सोडली. मग गल्लीतील फालतू पोरांबरोबर तीही फिरू लागली. सोळाव्या वर्षीच दिलीप हळदणकर नावाच्या तिच्या वयापेक्षा दहा वर्षांनी मोठ्या असलेल्या युवकाबरोबर ती पळून गेली. त्याच्याबरोबर लग्न केले. मग तिच्या आईवडिलांनी तिच्याशी संबंध तोडून टाकले.

दिलीप साईन बोर्ड पेंटींगचे काम करत असे. वैशाली त्याच्याबरोबर झोपडपट्टीत राहूनही खुश होती. दोघांना दोन मुलेही झाली. पण नंतर दिलीपला दारूची सवय लागली. मग त्याने काम करणे सोडून दिले. वैशालीला पैसे कमावण्यासाठी बाहेरची वाट धरणे भाग पडले. धुणे-भांडी कर, फरशी पूस, रस विक्री कर, हॉस्पिटलमध्ये काम कर अशी अनेक कामे तिने केली. नंतर व्हिडीओ लायब्ररीत काम करायला लागली. तिथे आलेल्या एका ग्राहकाने तिला आपल्या बीयर बारच्या ऑर्केस्ट्रात गायची संधी दिली. मग वैशाली बारमध्ये गायला लागली. पण त्यामुळे घरी जायला उशीर व्हायला लागला. दिलीप तिच्यावर संशय घ्यायला लागला. आणि एक दिवस त्याने तिला सोडचिठ्ठी देऊन दुसरा घरोबा केला.

इकडे वैशालीवर 'टारझन' नावाचा एक गॅंगस्टर 'आशिक' झाला. वैशालीचे गाणे ऐकायला तो बारमध्ये येत असे. अखेर वैशालीलाही तो आवडला आणि ती त्याच्याबरोबर रहायला लागली. पण 'टारझन' गॅंगस्टर असल्याचे कळल्यानंतर वैशालीने त्याच्याशी असलेले संबंध तोडले.

वैशालीने सोळा वर्षांत महाराष्ट्र व अरब देशातील जवळपास ८० डान्सबारमध्ये काम केले आहे. तिच्याशी जोडल्या गेल्या प्रत्येक नातेसंबंधांत तिला अपमान आणि छळच सोसावा लागला. बारचे ग्राहक ते अगदी पोलिस या सार्‍यांनीच तिचे शोषण केले. या शोषणातून मुक्तीसाठी तिने दारूचा आसरा घेतला. मग शांती मिळविण्यासठी ती ओशोंच्या आश्रमातही गेली. पण 'बारवाली' असे संबोधन कानी पडू लागल्यानंतर 'शांती' इथेही मिळणार नाही हे स्पष्ट झाले. अशा परिस्थितीत आत्महत्येचे विचार तिच्या मनात येऊ लागले. याच काळात तिची भेट बार गर्ल्स युनियनच्या अध्यक्षा वर्षा काळे यांच्याशी झाली. त्यांनी वैशालीला आधार दिला. जगण्यासाठी प्रोत्साहन दिले. वैशालीच्या आयुष्याच्या चित्तरकथेला शब्दरूप देण्यासही त्यांनीच सांगितले. त्यांच्याच प्रेरणेतून वैशालीचे पुस्तक साकारले. आता वयाच्या ४१ व्या वर्षीही वैशाली वकिली शिकते आहे. वकिल बनून आपल्यासारख्या अन्यायपिडीत महिलांना न्याय मिळवून देण्याचे तिचे उद्दिष्ट आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi