Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंजाबच्या हृदयात संत नामदेवांना विशेष स्थान

sant namdev
पंढरपूर , शुक्रवार, 3 एप्रिल 2015 (13:00 IST)
भागवत धर्माची पताका संपूर्ण देशात फडकविणार्‍या संत नामदेवांच्या कर्मभूमीत अर्थात घुमानमध्ये यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साजरे होत आहे. या निमित्ताने पंजाबने नामदेवांवर महाराष्ट्रापेक्षा काकणभर अधिक केलेले प्रेम पाहावास मिळणार असल्यामुळे साहित्य संमेलनापेक्षा हा आनंद साहित्यांना भारावून टाकेल. साहित्य संमेलन दरवर्षी भरतात पण श्रध्दा व भक्ती पाहावायची असेल तर यंदा घुमानची वारी निश्चितच वेगळी ठरणार आहे.
 
महाराष्ट्र ही संतांची भूमी व संतांचे श्रध्दास्थान पंढरीचा विठोबा. ज्यावेळी जातीभेद, उच्चनीच, गरीब-श्रीमंत यांची मोठी भिंत समाजात उभी होती त्यावेळी विविध जातीत जन्माला आलेल्या संतांनी ही विषमतेची भिंत पाडण्याचे मोठे काम केले. यामध्ये संत नामदेवांनी महाराष्ट्र पुरते कार्य न करता भागवत धर्माचा प्रचार करण्यासाठी हिमालय ते कन्याकुमारी प्रवास केला. यावेळी त्यांना पंजाबच्या सरहद्दीमधून परकीय राजांची अतिक्रमणे होत असल्याची जाणीव झाली. ही अतिक्रमणे थोपविण्यासाठी, माणूस धर्म व भेदभाव घालविणे ही शिकवण देण्यासाठी संत नामदेवांनी तब्बल 12 वर्षे पंजाबच्या घुमानला मुक्काम ठोकला. या 12 वर्षात त्यांनी एवढे सामाजिक व धार्मिक कार्य केले की, आजदेखील पंजाबच्या हृदयात संत नामदेवांना स्थान आहे. यामुळेच शिखांच्या ग्रंथसाहिबामध्ये नामदेवांचे 61 अभंग आहेत. घुमान हे अमृतसरपासून 35 कि.मी. अंतरावरील गुरदासपूर जिल्ह्यातील छोटेसे गाव आहे. येथे संत नामदेवांच्या विविध कथा सांगणारे चार भव्य   गुरूद्वारा आहेत. यापैकी एक बाबा नामदेवजी का समाधी मंदिर आहे. येथे संगमरवरी समाधी असून एक पलंग ठेवण्यात आला आहे. नामदेवरा अजूनही येथे विश्रंती घेत आहेत, अशी येथील भाविकांची श्रध्दा असल्यामुळे आत कोणास बोलू दिले जात नाही. तसेच एका सोनच्या पत्रावर नामदेवांची मूर्ती कोरण्यात आली आहे. दुसरा तपिया नामिया गुरद्वारा असून येथे महाराज तपश्चर्येला बसत होते. येथे नामदेवांची पाच फुटाची संगमरवरी मूर्ती आहे. येथील गुरूद्वारातील तलावात स्नान केल्यावर त्वचारोग जातात असा अनुभव भक्त सांगतात. संत नामदेव तपश्चर्या केल्यावर एका खडकावर बसत. तेथे चरण नामिया गुरूद्वारा आहे. तर खुंडी साहब नामिया गुरूद्वारा संत नामदेवांनी केलेल्या चमत्काराची साक्ष आहे.

webdunia
संत नामदेवांनी या परिसरात अनेक चमत्कार केले. त्यांची कीर्ती ऐकून एक भक्त आला व महाराजांना काहीतरी चमत्कार करा म्हणून मागे लागला. शेवटी नामदेवांनी त्याच हातातील वाळलेल्या काठीला हात लावला आणि त्याला तत्काळ पालवी फुटली. हाच तो खुंडी गुरूद्वारा. यासह घुमान येथेच नामिया कोठी आहे. येथील शेतकरी आपल्या आर्थिक शक्तीप्रमाणे अन्नदानासाठी येथे धान्य देतात. दुसरे विशेष म्हणजे या परिसरात लग्न झालेले जोडपे प्रथम दर्शनासाठी या कोठीवर आणले जाते. या चारही गुरूद्वारांमध्ये बाराही महिने अन्नदान सुरू असते. वसंत पंचमी येथे घुमानला मोठी यात्रा भरते.
 
आपल्या राज्यातील हा मोठा संत पंजाबच्या मनावर राज्य करतो. यामुळेच अमृतसर, चंदीगड, जालंदर येथे त्यांच्या नावाने भवन, चौक उभारले आहेत. यावरून पंजाबने संत नामदेवांवर महाराष्ट्रापेक्षा अधिक प्रेम केल्याची खात्री पटते. यामुळे साहित्य संमेलनास येणारा प्रत्येक  व्यक्ती आमच्यासाठी पूजनीय असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. हा वेगळा अनुभव यंदा साहित्यिकांच्या गाठीशी राहणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi