Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हळुवारपणे मनाला स्पर्श करणारा कवितासंग्रह - निर्भय भरारी

हळुवारपणे मनाला स्पर्श करणारा कवितासंग्रह - निर्भय भरारी
, शुक्रवार, 10 जून 2016 (15:59 IST)
काही दिवसांपूर्वी कवितासागरचे संस्थापक डॉ. सुनिल दादा पाटील भेटले. त्यांनी कवी अभयकुमार श्रीपाल पाचोरे यांचा निर्भय भरारी हा प्रकाशनाच्या मार्गावरील मराठी कवितासंग्रह वाचण्यास दिला. मी पहिली कविता वाचली तिचे नाव निर्भय भरारी. ही कविता वाचत असतांना मी त्या कवितेमध्ये हरवूनच गेलो. त्या कवितेतील प्रत्येक शब्द हा माझ्या हृदयाला स्पर्श करणारा होता. त्यातील काही ओळींनी माझ्या मनाचा ठाव घेतला.
 
राहिलेय उभी मी स्वपायावर
अवलंबून नाही इतरांच्या निर्णयावर
आहेत माझ्यावर चांगले संस्कार
नाही त्यांना विसरणार जन्मभर
 
आपल लहानपणी मुलांना जे काही संस्कार देतो. तेच संस्कार भविष्यात मुलांच्या वाटचालीस एक मार्ग बनवत असतो. त्या मार्गानेच बहुधा अनेकजण मार्गक्रमण करून स्वतःचे आयुष्य यशाच्या उंच शिखरापर्यंत पोहचवत असतात. 
 
आज अनेक मोठ-मोठ्या व्यक्ती आपल्या भाषणामध्ये स्वतःवर झालेल्या लहानपणीच्या संस्काराचा आवर्जून उल्लेख करतात आणि त्यांनी मिळविलेल्या यशामध्ये बालपणीच्या संस्काराचा खूप मोलाचा वाटा आहे असे स्पष्ट आणि निर्भयपणे काबुल करतांना त्यांना आपण पाहतो. काही दिवसांपूर्वी सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना एका ठिकाणी विचारण्यात आले होते की, तुमच्या घरात कोण कोण राहते? त्यावर त्यांनी उत्तर दिले त्यावर एक व्यक्ती म्हणाली तुमची आई खूप वयस्कर आहेत त्या तुमच्याकडेच राहतात ना. त्या प्रश्‍नाचे उत्तर देतांना नाना पाटेकर म्हणाले, ‘अजून मी एवढा मोठा झालो नाही. माझी आई माझ्याकडे नाही तर मी तिच्याकडे राहतो’. या विचारातूनसुद्धा आपणाला एक संस्कार दिसून येतो.
 
कवी अभयकुमार श्रीपाल पाचोरे यांच्या या कवितासंग्रहामध्ये अनेक प्रकारच्या कवितांचा समावेश आहे. लहानातल्या लहानापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना विचार करण्यास भाग पाडतील अशा प्रकारच्या हळुवार मनाला स्पर्श करणा-या कवितांची रचना त्यांनी केली आहे. कमीत कमी शब्दांमध्ये उत्कृष्ट पद्धतीचा संदेश देण्याचे काम कवीने खूप छान पद्धतीने केले आहे. विशेष करून सध्याच्या काळात होत असलेला निर्सगाचा र्‍हास कशा पद्धतीने रोखता येईल आणि निसर्ग नसेल तर मानवजात व त्याचबरोबर सजीवांचा विनाश कशा पद्धतीने होईल यांचे गांभिर्य कवीने छोट्या-छोट्या कवितांच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
 
निरोप समारंभ, वळीव, मोबाईल, पुस्तक, आव्हान, लढायचं आहे मला, सिमेंटचे खोके, आजी, पैसा, रात्र, जिव्हाळा, खंबीर साथ, शेतकरी, नदी, न्याय अशा प्रकारच्या विविध विषयांवरील कवितांच्या माध्यमातून समाजाचे वास्तव स्वरूप कवीने सर्वांच्या समोर मांडले आहे. त्याच बरोबर सामाजिक प्रबोधनाचे कार्य देखील खूप उत्तम पद्धतीने केले आहे. निर्भय भरारी हा कवितासंग्रह प्रत्येकाने आवर्जून वाचायलाच हवा. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केसांचा मसाज करण्याच्या टिप्स