तूच आमचा त्राता, रक्षणकर्त्ता म्हणून देवालाही त्या दिवशी राखी वाहतात आणि उपयोगातल्या सगळ्या वस्तूंना देवराख्या बांधण्याची प्रथाही आढळते. आमच्या लहानपणी सकाळी अंघोळ करून आम्ही आमच्या उपाध्यायांपुढे उभे राहायचो अन् ते घरातल्या प्रत्येकाला मंत्र म्हणून हातात राखी बांधायचे. तेव्हा काही कळायचे नाही. पण आता वाटतंय की ते इतर सर्व व्याधींपासून आमचे रक्षण व्हावे या हेतूने हे अभिमंत्रीत सुरक्षाकवच हातात बांधत असावेत (हल्लीतर प्रत्येक तीर्थक्षेत्री हातात बांधायचे दोरे मिळतात.)
असा हा दिवस अगदी लहानग्यांपासून ते वृद्धापर्यंत सर्वच जण आनंदाने साजरा करतात. हल्ली तर घरात एकच मुलगा/मुलगी असतांना ह्या राखीच्या निमित्ताने दोन परिवार एकमेकांच्या आणखीनच जवळ येत आहेत हे काय कमी आहे?आजही उत्तर-भारतात नोकर मालकाला राखी बांधतात व गरीब लोक धनवंतांना! यामागेही श्रेष्ठ व ज्येष्ठ लोकांनी व या सारख्या लोकांपासूनही रक्षणाची जबाबदारी आणि आपल्या कुटुंबीयांची जबाबदारी तुमच्यावरच आह हे ही सूचित होते.
राखीच्या परंपरेचा आधुनिक संदर्भ
1992 मध्ये जगदलपूर (छत्तीसगढ़) येथील आदिवासी व मागास भागातील घनदाट जंगल परिसरातील दुर्मिळ झाडे नष्ट होण्याच्या मार्गावर असताना (औद्योगिकीकरण, लघुउद्योग यासाठी) त्यांच्या रक्षणासाठी सुनीती यादव नावाच्या एका गृहिणीने वेगळाच मार्ग शोधला. आजूबाजूच्या अशिक्षीत स्त्रियांना धार्मिक गोष्टींच्या सहाय्याने तीने वेगळाच अर्थ शिकवला, ''भावाने आपले रक्षण करावे म्हणून आपण त्याला राखी बांधतो तसेच वृक्षही पर्यावरण शुद्ध राखून एकप्रकारे आपले रक्षणच करतात तेव्हा या पौर्णिमेला 5 वृक्षांना राखी बांधून त्यांची पूजा करू.'' तिच्या या प्रस्तावावर 30-40 बायकांनी नटूनथटून झाडाला राख्या बांधून, हार घालून, फेर धरले. गाणी म्हटली हे पाहून गावकरीही त्यांच्यात सामील झाले आणि ही लोकजागृती आल्यामुळे जमीनदाराने वृक्षतोडीचा विचार रद्द केला.
हेच ते जुन्या धार्मिक कल्पनांना दिलेले आधुनिक रूप याची दखल घेऊन केंद्र सरकारने, वनमंडल हे सर्व राज्यात राखीसूत्राचा कार्यक्रम करण्याचे ठरवले आहे.