रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा हे दोन पवित्र सण एकाच दिवशी साजरे करण्यात येतात. प्राचीन व महाभारतकालीन ग्रंथातही या सणाचा संदर्भ सापडतो. देव व असुर यांच्यातील संघर्षात देवांचा जय झाल्यानंतर या सणास सुरूवात झाल्याचेही मानण्यात येते. दंतकथेनुसार देव व असुर यांच्यातील युद्धात देवांची पीछेहाट होत असलेली बघून देवराज इंद्र यांनी युद्धात भाग घेण्याचा निर्णय घेतला. इंद्राची पत्नी इंद्राणीने त्याच्या हातात रक्षाबंधन केले. यामुळे त्यांना युद्धात विजय प्राप्त झाला. पुराणांनुसार श्रावण पौर्णिमेस पुरोहितांनी दिलेले आशीर्वाद पवित्र मानले जातात.
या सणांस धर्मबंधनाचे स्वरूपही आहे. मध्ययुगीन भारतात बाहेरील आक्रमकांपासून महिलांचे सरंक्षण करण्यासाठी हा सण साजरा करण्यात येत होता. तेव्हापासून भावाच्या मनगटावर राखी बांधण्याच्या पवित्र संस्कृतीस सुरूवात झाली. महाराष्ट्रात नारळी पौर्णिमा म्हणून प्रचलित असलेल्या ह्या सणाच्या दिवशी पर्जन्यदेवता वरूण राजाची आराधना करण्यात येते.
या पवित्र दिवशी बहीण भावास अक्षता लावून ओवाळते व राखी बांधते. भाऊही आपल्या लाडक्या बहिणीस दागिने, कपडे यासारख्या भेटवस्तू देतात. रक्षाबंधनास सलोनो नावानेही ओळखले जाते. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदी किंवा तळ्यात स्नान करून सूर्यदेवास अर्घ्यदान करण्यात येते. गावानजीक नदी नसल्यास विहिरींवरही ही पूजा केली जाते. ब्राह्मण या दिवशी जुन्या जानव्याचा त्याग करून नवीन जानवे धारण करतात. श्रावण महिन्यातील पौर्णिमेस श्रावण नक्षत्र असल्यास त्यास अनुकूल व लाभदायक मानण्यात येते.
आश्विनीपासून रेवतीपर्यंत 27 नक्षत्रात श्रावण नक्षत्राचा क्रम बावीसावा आहे. या नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे. श्रावण महिन्यातील अंतिम तिथीस येणार्या श्रवण नक्षत्राच्या पौर्णिमेस म्हणूनच श्रावणी म्हणण्यात येते. या दिवशीच रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात येतो.