Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाथ संप्रदायाचे केंद्र मढी

नाथ संप्रदायाचे केंद्र मढी

दीपक खंडागळे

WD
धर्मयात्रेच्या या भागात आम्ही आपणास श्री क्षेत्र मढी देवस्थानचे दर्शन घडविणार आहोत. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात हे प्रसिद्ध देवस्थान आहे. या भागात सह्याद्रीच्या पर्वत रांगा पूर्व-पश्चिम दिशेने पसरलेल्या आहेत. या पर्वत रांगात गर्भगिरी पर्वत रांग अहमदनगर आणि बीड जिल्ह्यामध्ये पसरलेली आहे. हा परिसर निसर्गरम्य असून गर्भगिरीच्या पर्वत रांगेतून वाहणार्‍या पौनागिरी नदीशेजारी मढी हे गाव वसलेले आहे.

या गावातील उंच टेकडीवर श्री कानिफनाथ महाराजांनी शके 1710 फाल्गुन वैद्य पंचमीला संजीवन समाधी घेतली. नवनाथांपैकी एक कानिफनाथ महाराज आहेत. नाथपंथीयांचे आद्यपीठ म्हणून भारतभर प्रसिद्ध असलेले हे ठिकाण लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. महाराणी येसूबाईंनी छत्रपती शाहू महाराजांची औरंगजेब बादशहाच्या कैदेतून सुटका होण्‍यासाठी नाथांना केलेल्या नवसपूर्तीपोटी सरदार पिलाजी गायकवाड व कारभारी चिमाजी सावंत यांची नेमणूक करून मंदिर व गडाचे बांधकाम केले.

गडाच्या बांधकामासाठी पाणी मिळावे म्हणून राणी अहिल्यादेवी होळकर यांनी तीन बारव (विहीर) खोदल्या. त्यापैकी एक गौतमी बारव असून आजही अनेक भाविक तीर्थ म्हणून याचा उपयोग करतात. या गडावर येण्यासाठी तीन प्रवेशद्वार आहेत. पूर्व दरवाज्याला दोनशे पायर्‍या, उत्तरेला 100 तर पश्चिमेला 30 पायर्‍या आहेत.

webdunia
WD
मंदिराच्या उत्तरेला एक डाळीबांचे झाड आहे. डालीबाई या महिला शिष्येने नाथसंप्रदायामध्ये सामील होण्यासाठी‍ कानिफनाथांची तपश्चर्या केली होती. फाल्गुन अमावस्येला कानिफनाथ महाराजांनी तिला दर्शन दिले व तिला स्वहस्ते समाधी दिली. तिच्या खडतर तपश्चर्येमुळे तिच्याकडे भाविकांनी व्यक्त केलेली मनोकामना या झाडाला नाडी बांधून पूर्ण होते, अशी श्रद्धा आहे.

अहमदनगर जिल्हा नाथसंप्रदायाचा आणि वारकरी सांप्रदायाचा पाया आहे. गर्भागिरीचा संपूर्ण डोंगर नाथ संप्रदायाने व्यापून गेलेला आहे व याच डोंगरावर श्री कानिफनाथ, गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ, गहिनीनाथ आणि जालिंदरनाथ महाराजांच्या समाधी आहेत. श्री कानिफनाथ अखिल भारतीय भटक्या आणि निमभटक्या जाती जमातीचे आराध्य दैवत मानले जातात.

webdunia
WD
या मंदिराच्या बांधकामासाठी बलशाली अशा गोपाळ समाजाने मोठमोठी दगडे वाहून आणली. कैकाडी समाजाने बांबूची टोपली तयार केली. घिसाडी समाजाने लोखंडी काम केले, बेलदार समाजाने नक्षीकाम केले. कोल्हाटी समाजाने कसरत दाखवून उंच अशा ठिकाणी बुरूज बांधण्यास मदत केली. अशा प्रकारे वैदु, गारूडी, लमाण, भिल्ल, जोशी, कुभांर, वडारी अशा अठरापगड जाती जमातीच्या लोकांनी मिळून या मंदिराचे बांधकाम केले आहे. म्हणून या तीर्थस्थाला भटक्यांची पंढरी असे म्हणून ओळखले जाते.

या‍ ठिकाणी जातपंचायतीद्वारे श्री कानिफनाथ महाराजांना साक्षी मानून आपआपसातील तंटे मिटविले जातात. त्यामुळे हे तीर्थक्षेत्र त्यांचे सर्वोच्च न्यायालय समजले जाते. मढी येथील गाढवांचा बाजार संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. रंगपंचमीला हा बाजार भरतो व या‍ ठिकाणी कर्नाटक, गुजरात व मध्यप्रदेशातून गाढवे विक्रीसाठी येतात. या गाढवांचे मूल्य दहा हजारांपासून ते एक लाखापर्यंत पोहचते.

Share this Story:

Follow Webdunia marathi