हे राममंदिर प्राचीन पर्णकुटीच्या जागेवर असल्याचे बोलले जाते. तिथे आधी नागपंथीय साधू रहात. मंदिरालगत भैरवनाथ व गोरक्षनाथांचे मंदिरही आहे. काही नागपंथी साधूंना अरूणा-वरूणा नद्यांच्या संगमावर या मूर्ती सापडल्या आणि त्यांनी लाकडी मंदिर बांधले. पुढे १७८० मध्ये माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांनी सरदार रंगराव ओढेकरांना हे मंदिर बांधण्याची सूचना केली. १७९० मध्ये मंदिर बांधून पूर्ण झाले. त्याकाळी या बांधकामासाठी २३ लाखाचा खर्च आला. या मंदिरात पूर्वी दलितांना प्रवेश नव्हता. त्यामुळे त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मोठा लढा उभारण्यात आला. बरीच वर्षे लढा चालूनही त्याला यश आले नाही. अखेर याच घटनेने विदग्ध होऊन डॉ. आंबेडकरांनी येवला येथे हिंदू धर्मात जन्माला आलो तरी मरणार नाही, अशी घोषणा केली. पुढे या मंदिरात दलितानाही प्रवेश देण्यात आला. या लढ्याला काही वर्षांपूर्वीच ७५ वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी मंदिराच्या पुजार्यांच्या आजच्या पिढीतल्या प्रतिनिधींनी दलित भाविकांना सन्मानाने मंदिरात प्रवेश देऊन त्यांच्या हस्ते पूजा बांधली. ७५ वर्षात हे सामाजिक स्थित्यंतर त्या घटनेने घडले.
बघण्यासारखे इतर काही
याच मंदिराच्या परिसरात प्रसिद्ध सीतागुंफा आहेत. येथेच सीतेने साधना केल्याचे बोलले जाते. पंचवटी हे नाव ज्यामुळे पडले ते पाच प्रसिद्ध वटवृक्षही याच परिसरात आहेत. मंदिरापासूनच जवळच गोदावरी नदी वाहते. प्रसिद्ध रामकुंडही तेथेच आहे. शिवाय इतर मंदिरेही याच परिसरात आहेत.
कसे जाल?
रस्ता- नाशिक मुंबईहून १६० किलोमीटर व पु्ण्याहून २१० किलोमीटरवर आहे. मुंबई-आग्रा महामार्ग नाशिकमधूनच जातो.
रेल्वे- नाशिक मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे स्टेशन आहे. मध्य रेल्वेच्या मुंबईकडे जाणार्या जवळपास सर्व गाड्या नाशिकमधूनच जातात.
हवाई मार्ग- नाशिकला आता हवाई वाहतूकही होते. किंगफिशरद्वारे मुंबई ते नाशिक हवाई वाहतूक केली जाते.