Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जैन सिद्ध क्षेत्र बावनगजा

जैन सिद्ध क्षेत्र बावनगजा

भीका शर्मा

, सोमवार, 4 फेब्रुवारी 2008 (11:55 IST)
WDWD
धर्मयात्रा या सदरात आम्ही आपल्याला जगप्रसिद्ध जैन सिद्ध क्षेत्र बावनगजा (चुलगिरी) येथे घेऊन जात आहोत. नुकताच या सिद्ध क्षेत्री शतकातील पहिला महामस्तकाभिषेक सोहळा झाला. मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यापासून 8 क‍िलोमीटरवर असलेल्या या पवित्र स्थळी जैन धर्माचे पहिले तीर्थंकर ऋषभदेवजी (आदिनाथ) यांची 84 फूट उंच मूर्ती आहे. प्रतिमेचा रंग भूरा असून एकाच दगडात ती कोरली आहे. शेकडो वर्षांपासून अस्तित्वात असलेली ही ऋषभदेवजींची मूर्ती अहिंसा आणि सद्भावनेचा संदेश देणारी आहे.

इतिहास : या मूर्तीची निर्मिती केव्हा आणि कधी झाली यासंबंधीचा कुठलाही उल्लेख इतिहासात आढळत नाही. परंतु, ही मूर्ती 13 व्या शतकातील असल्याचे म्हटले जाते. एका शिलालेखानुसार इ. स.1516 मध्ये भट्टारक रतनकिर्ती यांनी बावनगजा मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.

webdunia
WDWD
मुस्लिम राजांच्या काळात ही मूर्ती उपेक्षितच राहीली. ऊन, पाऊस, वारा यांचा या प्रतिमेवर बराच विपरीत परिणाम झाला. दिगंबर जैन समाजाचे या मूर्तीकडे लक्ष गेल्यानंतर त्यांनी भारतीय पुरातत्त्व विभागाच्या मदतीने मूर्तीच्या जीर्णोद्धाराची योजना आखली. 1979 मध्ये या मूर्तीचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यासाठी 59,000 रुपये खर्च आला होता.

मूर्तीचा आकार :
उंची :84 फूट
दोन्ही हातांमधील अंतर :26 फूट
हाताची लांबी :46 फूट 6 इंच
कंबरेपासून तळपायापर्यंतची लांबी :47 फूट
पाय :13 फूट 09 इंच
नाक 3 फूट 3 इंच लांब
डोळे :3 फूट 3 इंच रूंद
कान :9 फूट 8 इंच लांब
दोन्ही कानांमधील अंतर :17 फूट 6 इंच
पायाचा घेर :5फूट 3 इंच

महामस्तकाभिषेक :
webdunia
WDWD
महामस्तकाभिषेक जवळपास 17 वर्षांनी होत असून या वर्षी 20 जानेवारीपासून 4 फेब्रुवारीपर्यंत तो सुरू आहे. यादरम्यान लाखो भाविकांनी येथे येऊन भगवान आदिनाथांचे दर्शन घेतले. पाणी, दुध आणि केशर यांनी अभिषेक केला जातो. दुग्धाभिषेकात दुधाची धार आदीनाथजींच्या डोक्यावरून थेट पायांपर्यंत वाहते. भाविक भजने म्हणत भगवंताची स्तुतीसुमने गातात. केशर अभिषेकाने संपूर्ण मूर्ती जणू केशरी झाल्याचे वाटते. नुकत्याच झालेल्या सोहळ्याला खूप गर्दी झाली होती. परिसरातील आदिवासीही या सोहळ्यास उपस्थित राहिले.

सौंदर्य :
बडवानीपासून बावनगजापर्यंतचा रस्ता सुंदर डोंगर दर्‍यातून जातो. पावसाळ्यात येथे नैसर्गिक झरे पाझरतात. त्यामुळे बावनगजातील नैसर्गिक दृश्य पाहून डोळे दिपून जातात. पावसाळ्यातच हे सौंदर्य बघण्यासाठी गर्दी होते. मध्य प्रदेश सरकारने बावनगजा (चुलगिरी) हे धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे.

कसे पोहोचाल?
इंदूर (155 किमी), खांडवा (180 किमी) येथे जाण्यासाठी टॅक्सी सुविधा उपलब्ध आहे.
जवळचे विमानतळ : देवी अहिल्या विमानतळ (155 किमी) इंदूर

राहण्याची व्यवस्था : बावनगजात 5 धर्मशाळा असून त्यात 50 पेक्षाही जास्त खोल्या आहेत. बडवानीत प्रत्येक वर्गातील सुविधेनुसार राहण्यासाठी हॉटेल आणि धर्मशाळा यांची व्यवस्था आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi