Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दक्षिण काशी अर्थात श्रीकालहस्ती

दक्षिण काशी अर्थात श्रीकालहस्ती

आय. वेंकटेश्वर राव

WD
आंध्र प्रदेशातील तिरूपती शहराजवळ श्रीकालहस्ती नावाचे गाव आहे. शिवभक्तांसाठी ते महत्त्वाचे आहे. पेन्नार नदीची शाखा असलेल्या स्वर्णमुखी नदीच्या तटावर वसलेले हे स्थान कालहस्ती या नावानेही ओळखले जाते. दक्षिण भारतातील शंकराच्या तीर्थस्थानांमध्ये या स्थानाचे विशेष महत्त्व आहे. नदीच्या काठापासून पर्वताच्या पायथ्यापर्यंत पसरलेल्या या जागेला दक्षिण कैलास व दक्षिण काशी या नावानेसुद्धा ओळखले जाते.

या मंदिराचे तीन विशाल गोपूर आणि शंभर स्तंभांचा मंडप म्हणजे स्थापत्याचे उत्तम उदाहरण आहे.

webdunia
WD
या स्थळाचे नाव तीन पशूंच्या नावांवर आधारीत आहे. 'श्री' म्हणजे माकडीण, 'काल' म्हणजे साप आणि 'हस्ती' म्हणजे हत्ती. या तिन्ही प्राण्यांनी शिवाची आराधना करून आपला उद्धार घडवून आणला होता. एका लोककथेनुसार, एका माकडीने शिवलिंगावर तपस्या केली होती. सापाने लिंगाभोवती वेटोळे घालून शिवाची आराधना केली होती आणि हत्तीने शिवलिंगावर अभिषेक केला होता. त्यांच्या या भक्तीमुळेच या स्थळाळा श्रीकालहस्ती असे नाव पडले. या प्राण्यांच्या मूर्ती येथे आहेत.

webdunia
WD
स्कंद पुराण, शिव पुराण आणि लिंग पुराणातही श्रीकालहस्तीचे उल्लेख आहेत. स्कंद पुराणानुसार एकदा या जागेवर अर्जुन आला होता. त्याने प्रभू कालाहस्तीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर पर्वतावर जाऊन भारद्वाज मुनींचे सुद्धा दर्शन घेतले होते. कणप्पा नावाच्या एका आदिवासीने येथे शिवाची आराधना केली होती, असाही एक उल्लेख आहे. हे मंदिर राहू काल पूजेसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे.

अन्य आकर्षण - या क्षेत्राजवळ बरीच धार्मिक स्थळे आहेत. विश्वनाथ मंदिर, कणप्पा मंदिर, मणिकर्णिका मंदिर, सूर्यनारायण मंदिर, भारद्वाज तीर्थ, कृष्णदेव मंडप, श्री सुकब्रह्माश्रम, वैय्यालिंगाकोण, पर्वतावरील दुर्गम मंदिर आणि दक्षिण कालीचे मंदिर आदी प्रमुख मंदिरे आहेत.

फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा

कसे पोहोचाल? या स्थानापासून सर्वांत जवळचे विमानतळ तिरूपती आहे. ते येथून फक्त वीस किलोमीटरवर आहे.
मद्रास-विजयवाडा रेल्वे लाइनवर हे स्थान आहे. त्यामुळे गुंटूर वा चेन्नईहून सुद्धा येथे जाता येते. विजयवाडापासून तिरूपतीला जाणार्‍या सर्व गाड्या कालहस्तीत थांबतात. आंध्र प्रदेश परिवहन मंडळाची बस सेवा तिरूपतीपासून प्रत्येक 10 मिनिटाने या स्थळासाठी उपलब्ध आहे.

रहाण्याची सोयः चितूर आणि तिरूपतीत हॉटेलच्या रूपाने रहाण्याची उत्तम सोय आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi