Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नांदेडचा सचखंड गुरूद्वारा

-हर‍दीप कौर

नांदेडचा सचखंड गुरूद्वारा
गोदावरीच्या नदीकिनारी वसलेले मराठवाड्यातील नांदेड हे शीख धर्मियांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. त्याचप्रमाणे मराठी व शीख बांधवांना जोडणारा तो प्रमुख धागाही आहे. महाराष्ट्रातलेच संत नामदेव तेराव्या शतकात फिरत फिरत पंजाबात गेले होते. अनेक वर्षे तिथे राहून त्यांनी प्रवचने दिली. लोकांना सन्मार्गाला लावले. त्याच पंजाबातील शीख धर्मियांचे दहावे गुरू गुरू गोविंद सिंह मुगल बादशाह औरंगाजेबाच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रात नांदेडला आले आणि एक वर्तुळ पूर्ण झाले.

गुरू गोविंदसिंहांचे माता पिता व चारही मुले देशासाठी शहिद झाली होती. विदग्ध अवस्थेत इथे आलेल्या गुरू गोविंदसिहांचे मन अध्यात्मिक भावनेने भरले होते. येथे आल्यानंतर त्यांनी नगीना घाटावरून बाण मारून आपल्या सद्गुरूंचे स्थान शोधून काढले. त्यांनी सोडलेला बाण एका मशिदीत गेला. तिथे दीड हात जमिन खोदल्यानंतर सतयुगी आसन, करमंडल, खडावा आणि माळ सापडली. या बदल्यात जमीन मालकाला सोन्याच्या मोहरा दिल्या.

WD
याच ठिकाणी त्यांनी रहायला सुरवात केली. त्यांच्या आयुष्याचा बहुमुल्य काळ येथे गेला. येथेच त्यांनी आपण शीखांचे शेवटचे गुरू असे जाहीर करून गुरू परंपरा थांबवली. शिवाय 'गुरू ग्रंथ साहिब' या ग्रंथाला शीखांचा पवित्र धर्मग्रंथ म्हणून जाहीर केले. त्यांच्याच शब्दांत त्यांनी जाहीर केलेली ही घोषणा अशी.

आगिआ भई अकाल की तवी चलाओ पंथ।।
सब सिखन को हुकम है गुरू म‍ानियो ग्रंथ।।
गुरू ग्रंथ जी मानियो प्रगट गुरां की देह।।
जो प्रभ को मिलबो चहै खोज शब्द में लेह।

यानंतर त्यांनी या जागेला अबचलनगर असे नाव दिले. येथेच १७६५ मध्ये कार्तिक शुद्ध पंचमीला गुरू गोविंद सिहांचे निर्वाणही येथेच झाले. नुकतीच या घटनेला तीनशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 'गुरू दा गद्दी' सोहळा थाटात साजरा झाला. त्यासाठी देश-विदेशातून लोक आले होते. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्यासह राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचीही सन्माननीय उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती.

webdunia
WD
येथे रोज सकाळी गोदावरीतून घागर भरून सचखंडमध्ये आणली जाते. धार्मिक ग्रंथांचे पठण केले जाते. दिवसभर भजन, कीर्तन सुरू असते. या गुरूद्वारात दसरा, दिवाळी व होला मोहल्ला उत्साहात साजरा केला जातो.

कसे जाल:

हवाई मार्ग :- नांदेडमध्ये विमानतळ आहे. सचखंडपासून तो फक्त पाच किलोमीटरवर आहे.
रस्ता मार्ग - औरंगाबादपासून नांदेड ३०० किलोमीटरवर आहे. राज्य परिवहन मंडळाची बस तसेच खासगी बसही येथे जाण्यसाठी उपलब्ध असतात.
रेल्वेमार्ग - रेल्वे स्टेशन असल्याने देशातील प्रमुख ठिकाणांहून येथे येण्यास रेल्वे उपलब्ध आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi