लेझीम पथक, ढोल-ताशे, विविध वेशभूषा आणि आणि देखावे असा लवाजम्यासह महाबळेश्वर येथे होणा-या 82 व्या अ. भा. साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी निघणार आहे, अशी माहिती ग्रंथदिंडी प्रमुख किसन खामकर आणि लीला शिंदे यांनी दिली.
संमेलनाच्या परंपरेप्रमाणे ग्रंथदिंडीने 82 व्या संमेलनास प्रारंभ होणार आहे. दि. 20 मार्च रोजी वेण्णा दर्शन या साहित्य संमेलनाच्या मध्यवर्ती कार्यालयापासून दिंडी निघणार आहे. संमेलनाध्यक्ष डॉ. आनंद यादव, महामंडळाचे अध्यक्ष डॉ. कौतिकराव ठाले पाटील आणि समस्त स्वारस्वतांच्या उपस्थितीत दिंडी सोहळा संपन्न होणार आहे.
ग्रंथदिंडीचे नियोजन करण्यात आले आहे. अग्रभागी असणा-या पालखीत ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथेसह अन्य ग्रंथ आणि शेजारी अबदागिरी राहणार आहे. त्यापुढे बालकलाकार आपली कला सादर करतील. अग्रभागी लेझीम पथक, ढोल पथक राहणार आहे. गणेश भक्त मंडळाचे कार्यकर्ते आणि साहित्यिक मोठ्या संख्येने सहभागी होतील.
दरम्यान, परिसरातील मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात येणार आहेत. महाबळेश्वरमधील विविध महिला मंडळाच्या शंभराहून अधिक महिला नऊवारी साडीत सहभागी होणार असून दिंडी मार्गावर झिम्मा, फुगडी घालीत संमेलनस्थळी पोहोचणार आहेत. त्याचबरोबरीने अंगणवाडीच्या आणि महिला बचत गटाच्या महिलाही सहभागी होणार आहेत. महाबळेश्वर प्रतिष्ठानचे 40 सदस्य विविध वेशभूषेत सहभागी होणार आहेत.
वेण्णा दर्शन येथून पंचायत समिती, हॉटेल सनी, रमा हॉटेल, पोलिस स्टेशन, कोळी अळी, सुभाष चौक, पॅनोरामा हॉटेल, एस. टी स्टॅण्ड, रे गार्डन मार्गे माखरिया हायस्कूलच्या पटांगणात येईल. याचठिकाणी ग्रंथप्रदर्शन भरणार आहे. या दिंडीसाठी लीलाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली किसन खामकर, अरुण शिंगटे, वाशिवले, सीमा रेवणे, मंदा डोईफोडे यांचे कमिटी कार्यरत आहे.